

125,000 Sindhudurg Residents Migrated Over 15 Years
सिंधुदुर्ग : गणेश जेठे
देशभर लोकसंख्यावाढीचा वाढता आलेख सतावणारा असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या मात्र गेल्या १५ वर्षात तब्बल १ लाख २६ हजाराने घटली आहे. केवळ ग्रामीण भागातूनच नव्हे, तर शहरी भागातूनही स्थलांतर वाढत चालले आहे. त्याबरोबरच कुटुंब नियोजन कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणीमुळे घटलेला जन्मदरसुद्धा याला कारणीभूत आहे. याउलट जिल्ह्यातील मृत्यूदर महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याची नोंदही सिंधुदुर्ग जिल्ह्यातच करण्यात आली आहे.
पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी
यशस्वीपणे पार पडली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गेल्या एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन माणसे मोजण्यात आली. आरोग्य विभागाने केलेल्या हेड काऊटिंगनुसार लोकसंख्येमध्येही मोठी घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जी माणसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या घरात राहतात, अशा माणसांची मोजणी करण्यात आली. ज्या माणसांचे नाव रेशन कार्ड व मतदार यादीत आहे; परंतु कायमस्वरूपी मुंबईत राहतात किंवा अन्य शहरांमध्ये राहतात, अशा माणसांना वगळण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष लोकसंख्या मोजता आली.
सध्या नव्या जनगणनेचे वारे सुरू असून यापूर्वीची जणगणना २०११ मध्ये झाली होती. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या एकूण ८ लाख ५९ हजार ६५१ इतकी होती. विशेष म्हणजे २००१ मध्ये झालेल्या जनगणनेच्या तुलनेत २०११ मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये ५० हजार लोकसंख्या कमी झालीच होती. सन २०११ सालानंतर जिल्ह्याची लोकसंख्या वाढेल, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु प्रत्यक्षात लोकसंख्या वेगाने घटताना दिसते आहे. २०११ च्या जनगणनेमध्ये ७ लाख ४२ हजार ६४५ म्हणजे सुमारे ८७ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत होती आणि १ लाख ७ हजार ००६ इतकी म्हणजेच १३ टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत होती.
सध्या आरोग्य विभागाने जी लोकसंख्या मोजणी केली, त्यानुसार ७ लाख २३ हजार २२६ इतके लोक जिल्ह्यात राहत आहेत. त्यामध्ये ६ लाख ५१ हजार ७३९ म्हणजेच २० टक्के लोक ग्रामीण भागात राहत आहेत आणि १० टक्के लोक जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी शहरी भागात राहत आहेत.
देश-राज्यापेक्षा दुप्पट आहे मृत्यूदर
सध्या महाराष्ट्राचा जन्मदर दर हजारी लोकसंख्येमागे १४.७इतका आणि देशाचा जन्मदर १९.१ असताना सिंधुदुर्गचा जन्मद मात्र केवळ ६.५ इतका आहे. तो देशातील सर्वात कमी आहे. उलटपक्षी मृत्यूदर मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक राहिला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर ६.६ आणि देशाचा मृत्यूदर ६.८ इतका असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यूदर ११.७३ इतका आहे. याचे कारण मुंबई आणि पुणे शहरातून व इतर भागातून नोकरी करून निवृत्त झालेले चाकरमानी निवृत्तीनंतर आपल्या गावी येऊन राहतात आणि इथेच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.