

रत्नागिरी : नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली असून शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रचाराला महाराष्ट्रातून विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेसह महायुतीला या निवडणुकीत मोठा विजय मिळेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 53 विक्रमी सभा घेतल्या आणि 20 जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला. या सभांमध्ये शिंदे साहेबांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला, त्याचा फायदा नक्कीच शिवसेना, महायुती आणि युतीला होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या स्तरावर घेतलेले निर्णय विशेषत: माझी लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, स्वयंरोजगारासाठीचे निर्णय आणि मुलींचे शिक्षण पूर्ण मोफत करण्याचा निर्णय, याला जनतेने निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तसेच, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आठ जिल्ह्यांचा दौरा करून 22 सभा घेतल्या.
आम्ही मंत्र्यांनीही पूर्ण महाराष्ट्रात दौरे केले असून, मी स्वतः सात ते आठ जिल्ह्यांमध्ये 27 ते 28 सभा घेतल्या आहेत. या एकंदरीत वातावरणातून सामंत यांनी स्पष्ट केले की, महायुती, युती आणि सोबत शिवसेनेचा आकडा नक्कीच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे असेल. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्या तरी, माननीय मुख्यमंत्र्यांंनी कुठेही कटुता आणली नाही आणि ते विकासाच्या पुढे गेले.
भविष्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीची भूमिका पदाधिकारी घेणार नाहीत, यासाठी पक्षप्रमुख (शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) यांनी एकत्र बसून पुढाकार घेतला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मैत्रीपूर्ण लढतीत गैरवर्तन झाल्यास शिंदे साहेब, मुख्यमंत्री आणि अजित दादा हे जाब विचारतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाविकास आघाडीवर टीका
सामंत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते प्रचार करताना दिसले नाहीत. याचा अर्थ महाविकास आघाडीने निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरच स्वतःचा पराभव मान्य केलेला असल्याचे त्यांनी सांगितले.