

राजापूर : एक महिन्यापूर्वी रायपाटण, टक्केवाडी येथे महिलेचा झालेला खून त्यानंतर मागील आठवड्यात कोळवणखडी येथे झालेली घरफोडी यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश न आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यातूनच कायदा सुव्यवस्थेला मोठे आव्हान उभे ठाकले असून या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिस ठाणे अंतर्गत रायपाटण येथे असलेल्या पोलिस दूरक्षेत्र कार्यालयासह अणुस्कुरा घाटातील पोलिस चौकीला भक्कम बळकटी देणे तसेच घाटाच्या वरील बाजूला कोल्हापूर विभाग पोलिस दलाच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात नवीन चेक पोस्ट सुरू करणे क्रमप्राप्त बनले आहे.
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये राजापूर तालुक्यामध्ये अनेक भागात घरफोड्यांचे अनेक प्रकार घडले आहेत. राजापूर पोलिस ठाण्यात त्याची नोंद झालेली आहे. मात्र, त्यातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. तालुक्यात घरफोड्यांचे प्रकार सुरु असतानाच पूर्व परिसरात सुध्दा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.सुमारे एक महिन्यापूर्वी रायपाटण, टक्केवाडी येथे श्रीमती वैशाली शेट्ये हि महिला तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तपासाअंती त्या महिलेचा खून झाल्याचे सिद्ध झाले होते. त्या घटनेला महिना उलटून गेला तरी अद्याप आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
राजापूर पोलिस ठाणे अंतर्गत रायपाटण येथे पोलिस दुरक्षेत्र असून विद्यमान क्षणी चार कर्मचारी तैनात आहेत. संपूर्ण परिसरातील 28 गावांसाठी हे पोलिस दुरक्षेत्र असून अलीकडच्या काळात वाढत असलेले गुन्हे लक्षात घेता भविष्यात या पोलिस ठाण्यामध्ये आणखी काही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक बनले आहे. शिवाय येथे एक वरिष्ठ अधिकारी नियुक्त केला जावा, अशी सातत्याने मागणी गेले काही वर्ष सुरू आहे. शिवाय रायपाटण पोलिस दूरक्षेत्रामधील पोलिसांना फिरण्यासाठी स्वतंत्र चार चाकी वाहन आवश्यक असून संबंधित विभागाकडून तत्काळ ते उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे.