

दापोली : दापोली तालुक्यातील लाडघर, बुरोंडी व तामसतीर्थ परिसरात चोरट्यांची धाडसी मोहीम सुरू असून, मागील दोन महिन्यांत तब्बल सात ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच लाडघर येथे सुरेश जाधव यांच्या बंद घरात चोरट्यांनी बिनधास्त दोन दिवस वावर करून झाडाझडती घेतली. अंगणात गाडी उभी करून घरात दिवाही लावला, मात्र किमती माल न सापडल्याने मोठ्या प्रमाणात नासधूस केली. काळ्या रंगाची एक्सेस (125 सीसी) ही दुचाकी चोरट्यांच्या वापरात असल्याचे स्थानिकांनी पाहिल्याचे सांगितले. घरमालक मुंबईत वास्तव्यास असल्याने गावकऱ्यांनी घरचे कोणी आले असेल करून दुर्लक्ष केले. बुरोंडीतील भरवस्तीतील राजन केळसकर यांच्या घरातील मंडळी दापोलीला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी किमती ऐवज लुटला. तसेच दीपक शिरगावकर यांच्या घरातही सोने व रोकड चोरून चोरटे फरार झाले.
तामसतीर्थ येथील हॉटेल तामसतीर्थ सनसेट पॉईंट येथे सिलिंडर, गॅस शेगडीसह 60 ते 70 हजारांचा माल लंपास करण्यात आला. करजगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दानपेटी, तर वळेश्वर मंदिरातील दानरकमेही चोरट्यांनी चोरून नेली. नुकतीच बुरोंडीतील सुधाकर राणे यांच्या घरावरही हात साफ करण्यात आला आहे. सलग चोरीच्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले असून, चोरट्यांची धमक वाढत असल्याचे दिसते. मात्र, सर्व घटनांनंतरही चोरट्यांचा ठसा पोलिसांना अद्याप सापडलेला नाही, ही चिंतेची बाब मानली जाते.