Ratnagiri News : महायुतीतून राष्ट्रवादी तर आघाडीतून काँग्रेस ‌‘आऊट‌’?

चिपळुणात महायुती, आघाडीत जागावाटपावरून धुसफूस
Ratnagiri News
चिपळूण नगर परिषद
Published on
Updated on

चिपळूण : चिपळूण न.प.च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक उलथापालथी घडल्या. शिंदे सेना आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला विश्वासात न घेता जागावाटप केले आणि महायुतीऐवजी युती झाल्याचे सांगण्यात आले. या युतीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला डावलल्याचे सांगितले जात होते तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस बाहेर गेल्याचे चित्र चिपळुणात पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी तीन दिवसांत आघाडी व महायुतीमधील चर्चेदरम्यान तोडगा पडतो की स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाते हे स्पष्ट होणार आहे. मात्र, अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरल्याने अनेक उमेदवार सैरभैर झाले.

Ratnagiri News
Ratnagiri News : चिपळुणात सर्वच पक्षांचे स्वतंत्र उमेदवारी अर्ज

अखेरच्या दिवशी जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली तर काही राजकीय पक्षांना आयत्यावेळी उमेदवारांची शोधाशोध देखील करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने महायुती संदर्भात अनेकवेळा चर्चा केल्या. मात्र, दोन जागांवरून शिंदे सेनेने हट्ट धरल्याने महायुतीचे गणित जुळले नाही. अखेरच्या टप्प्यापर्यंत वाटाघाटी सुरू ठेवून जास्तीत जास्त ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने घेतला आणि ऐनवेळी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने मात्र नमती भूमिका घेत नगराध्यक्षपद शिंदे सेनेला देत महायुती ऐवजी युतीचा निर्णय घेतला.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी रात्रभर अनेक राजकीय घडामोडी शहरात घडल्या. त्यामुळे महायुतीचे गणित फिस्कटले. नगराध्यक्षपद व नगरसेवक पदाच्या जागा वाटपावरून तिनही पक्षात बिनसले आहे. मात्र, भाजप आणि शिंदे सेना यांनी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला डावलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातूनच मिलिंद कापडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला तर भाजपाने या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखलच केलेला नाही. या निमित्ताने महायुतीमधील घटक पक्षात कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळाले. त्यामुळे आमदार शेखर निकम आपल्या चिपळुणातील संपर्क कार्यालयात ठाण मांडून बसले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत महायुतीत समझोता होतो का? याची प्रतिक्षा करून राष्ट्रवादी स्वबळाचा निर्णय घेणार आहे.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी दिसून आली. एकतर आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली आहे व काँग्रेसने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र, अखेरच्या दिवशी ठाकरे शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसून आली. आ. भास्कर जाधव यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीशी जवळीक करून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी आमदार रमेश कदम यांच्याशी आघाडी केल्याचे स्पष्ट केले होते. असे असताना ठाकरे शिवसेनेने देखील नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी सर्व प्रभागात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे देखील पाहायला मिळाले. ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे आदेश मिळाल्याचे सांगण्यात आले.

Ratnagiri News
Ratnagiri News : भाजप जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांचा राजीनामा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news