

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी नगरसेवकपदासाठी 26 जणांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी रविवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. आता नगराध्यक्षपदासाठी 5 तर नगसेवकपदासाठी 61 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार व काँग्रेसच्या उमेदवारांनी रविवारी अर्ज दाखल केले. परंतु महाविकास आघाडी अथवा महायुतीची घोषणा अद्याप झालेली नाही तर महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, अखेरच्या टप्प्यात महायुती व आघाडीच्या वाटाघाटी सुरू आहेत.
चिपळूण नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली आहे. सर्वच पक्षात सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस नगराध्यक्षपदाच्या मुद्द्यावर ठाम आहे तर दुसऱ्या बाजूला अद्याप महायुतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी एकही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. रविवारी भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली काही उमेदवारांनी जोरदार वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, आशिष खातू, अंजली कदम, रूपाली दांडेकर, रूही खेडेकर, शुभम पिसे, शितल रानडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुप्रिया जाधव, सुनील रेडीज, शैनाज वांगडे, योगेश पवार, आदिती देशपांडे, वर्षा भोजने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह व जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली साजिद सरगुरोह, निर्मला जाधव तर शिंदे गटातर्फे कपिल शिर्के यांनी अर्ज दाखल केला. सोमवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे. महायुतीतर्फे नगराध्यक्षपद कोणाला द्यायचे या मुद्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज कोण भरणार हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीकडून तिघांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीच्या वाटाघाटी सुरू आहेत. चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. काही झाले तरी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढविणार आहोत. लवकरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल. भाजपची पहिली यादी निश्चीत झाली आहे. रविवारी रात्रीपर्यंत उर्वरीत उमेदवार आणि महायुतीच्या वाटाघाटी पूर्णत्वास जातील, असे भाजपाचे नेते प्रशांत यादव यांनी सांगितले.