

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्यासंदर्भात संगमेश्वरवासीयांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या स्थानकावर आणखी दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबे मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे संगमेश्वर परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यासाठी संदेश जिमण यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यासाठी आंदोलनेदेखील छेडण्यात आली होती.
यासंदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जामनगर - तिरुनेलवेली एक्स्प्रेस (गाडी क्र. 19578/19577), पोरबंदर-तिरुअनंतपूरम एक्स्प्रेस (गाडी क्र. 20910/20909) या दोन दूरपल्ल्याच्या एक्स्पेेस गाड्यांना प्रयोगिक तत्त्वावर थांबे मंजूर करण्यात आले आहेत. यातील जामनगर एक्स्प्रेसला 26 डिसेंबरपासून, तर पोरबंदर एक्स्प्रेस 25 डिसेबरपासून संगमेश्वर थांबा घेणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच कोकण रेल्वेने नेत्रावती एक्स्प्रेसला संगमेश्वर येथे थांबा दिला होता. त्यानंतर आता या दोन नवीन गाड्यांची भर पडल्यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणखे दोन गाड्यांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेषतः गुजरात आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरेल. या दोन्ही गाड्यांना देण्यात आलेला थांबे रेल्वे बोर्डाकडून प्रायोगिन तत्वावर मंजूर करण्यात आले आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून हा निर्णय कायमस्वरूपी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.