

Ratnagiri Zilla Parishad Bribe Case
रत्नागिरी : लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-1 अधिकारी, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एक कंत्राटी शिपाई यांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली.
शरद रघुनाथ जाधव (सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय), सिद्धार्थ विजय शेट्ये (सहाय्यक लेखा अधिकारी, जिल्हा परिषद वित्त विभाग), सतेज शांताराम घवाळी (कंत्राटी शिपाई) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत .
तक्रारदार हे दापोली पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी असून त्यांनी आपल्या कार्यालयाचे 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण केलेल्या अहवालातील 21 प्रलंबित मुद्यांची पूर्तता करून 5 ऑगस्ट 2025 रोजी अनुपाल अहवाल सादर केला होता. मात्र, तो अंतिम करण्यासाठी संशयितांनी 24 हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाच मागणीविरोधात तक्रारदाराने 11 सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत आरोप खरे ठरले आणि तडजोडीअंती 16 हजार 500 रुपयांची लाच घेण्याचे ठरले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी 7.46 वाजता एसीबीच्या पथकाने स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात सापळा रचला.
यावेळी, शरद जाधव यांच्या संमतीने कंत्राटी शिपाई सतेज घवाळीने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारली व ती तत्काळ सिद्धार्थ शेट्येकडे सुपूर्द केली. त्याच क्षणी एसीबीने तिघांनाही रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार उदय चांदणे, हवालदार विशाल नलावडे, संजय वाघाटे, दीपक आंबेकर तसेच शिपाई हेमंत पवार आणि राजेश गावकर यांनी केली.