

लोटे : कोकण रेल्वे, मध्य रेल्वेकडे रत्नागिरी-दादर पॅसेंजर व मुंबई-चिपळूण अशा दोन नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात; अन्यथा 2 ऑक्टोबरपासून लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा जल फाऊंडेशन कोकण विभाग अध्यक्ष नितीन जाधव यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना व मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून मध्य रेल्वेकडे कोकण विभागासाठी व प्रवाशांच्या हितासाठी रत्नागिरी-दादर व मुंबई-चिपळूण या रेल्वेगाड्या सुरू कराव्यात यासाठी सातत्याने मागणी करीत आहोत. त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही.
1996 पासून कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेली व मध्य रेल्वेने मार्च 2020 पासून अचानक बंद केलेली 50103/50104 ही रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणेच दादरपर्यंत चालवावी अशी मागणी आहे. तसेच मुंबई व चिपळूण दरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, ए.सी. चेअर कार व सामान्यांसाठी अनारक्षित डबे असलेली रेल्वे गाडी सुरू करावी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा दक्षिण भारतातून येणार्या रेल्वे गाड्या गर्दीने भरून येतात. यामुळे रत्नागिरीच्या पुढील स्टेशनमधील लोकांना रेल्वे गाड्यांमध्ये चढणे मुश्कील होते. याची दखल घेऊन मध्य रेल्वेने चिपळूण-दादर अशी नवी रेल्वेगाडी सुरू करावी. ही गाडी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकावर थांबणारी दैनिक गाडी असावी, अशी मागणी आहे. ही गाडी पहाटे किंवा सकाळी लवकरच मुंबईतून सुटून चिपळूणहून दुपारी किंवा सायंकाळी मुंबईकडे सोडावी. ही गाडी नमो भारत रॅपिड रेल रॅकने चालविल्यास प्रवाशांना फायदा होऊ शकतो. याबाबत 2 ऑक्टो.पूर्वी निर्णय घ्यावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.