रत्नागिरी जिल्हा बँक घोटाळा; अपहारीत सोने इतर बँकांत तारण ठेवून शिपायाने 35 लाखांचे घेतले कर्ज
रत्नागिरी ः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील अपहार करण्यात आलेल्या 50 लाखांच्या 504.34 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा म्हणजेच 100 टक्के मुद्देमालाचा शोध घेण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
यातील 2 तोळे सोने यापूर्वीच संशयित शिपायाच्या घरातून पोेलिसांनी हस्तगत केले होते, तर उर्वरित सोन्याचे दागिने संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते (42, रा. टिके, रत्नागिरी) याने रत्नागिरीतील 4 ते 5 बँकांमध्ये तारण ठेवून त्यातून तब्बल 35 लाखांचे कर्ज काढले, परंतु त्याने एका बँकेतून कर्ज काढून दुसर्या बँकेचे कर्ज भागवले असे वारंवार करून त्याने कर्जाची 35 लाखांची रक्कम संपवली आहे. शहर पोलिस विभागाकडून संबंधित बँकांना नोटीस जारी केल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. संशयिताने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल 50 लाखांचे सोने बँकेचा कॅशियर आणि शाखाधिकारी यांच्या संगनमताने लांबवले होते. शाखाधिकारी किरण बारये याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्याची सुनावणी बाकी आहे.

