

पुढारी मल्टिमीडिया टीम
Ratnagiri Zp Election 2026 News
रत्नागिरी: कोकणच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचा माहोल सध्या कोकणात तापला आहे. रत्नागिरीचा गड जिंकण्यासाठी शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना एकमेकांसमोर शड्डू ठोकून रणमैदानात उतरले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले असून, ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडाला आहे.
रत्नागिरीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असला तरी मुख्य लढत दोन्ही शिवसेनांमध्येच आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने येथे सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. उदय सामंत आणि त्यांचे बंधू राजापूरचे आमदार किरण सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी महायुतीने विजयाचे खाते उघडले आहे. पाली-नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे (शिंदेंची शिवसेना) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी महायुतीला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. तिकीट वाटपात जाधवांना डावलण्यात आल्यानं ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या नाराजीचा फटका मविआला बसणार का, याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर पुन्हा 'धनुष्यबाण' (शिंदेंची शिवसेना) चालणार की 'मशाल' (ठाकरेंची शिवसेना) पेटणार, याचे उत्तर ७ फेब्रुवारीच्या निकालातून मिळणार आहे.
• एकूण जिल्हा परिषद जागा - ५६
• एकूण जि.प. उमेदवार - २२९
• एकूण पंचायत समिती जागा - ११२
• एकूण पंचायत समिती उमेदवार - ४३४
• बिनविरोध निवड: डॉ. पद्मजा कांबळे (शिंदेंची शिवसेना) - पाली नाणीज पंचायत समिती गण
• खासदार: नारायण राणे (भाजप - रत्नागिरी-सिंधुदुर्ग).
• आमदार:
1. उदय सामंत (रत्नागिरी - शिंदेची शिवसेना)
2. योगेश कदम (दापोली, शिंदेंची शिवसेना)
3. शेखर निकम (चिपळूण, अजित पवारांची राष्ट्रवादी)
4. किरण सामंत (राजापूर, शिंदेंची शिवसेना)
5. भास्कर जाधव (गुहागर, ठाकरेंची शिवसेना)
२०१७ मध्ये शिवसेनेने येथे एकहाती सत्ता मिळवली होती
• शिवसेना: ३९ जागा
• राष्ट्रवादी काँग्रेस: ११ जागा
• भाजप: ०३ जागा
• काँग्रेस: ०३ जागा
१. रिफायनरी प्रकल्प: राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन आणि विरोध हा निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा
२. विकासकामे: ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य सुविधा आणि रखडलेले पाणी पुरवठा प्रकल्प
३. पर्यटन आणि पायाभूत सुविधा: कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि पर्यटन विकासाचे आश्वासन
४. स्थानिक नेतृत्व: उदय सामंत यांचे वाढते वर्चस्व मोडून काढण्यासाठी ठाकरे गटाने लावलेली ताकद