

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अन जिल्हा परिषद पंचायत समितीचे कर्तव्य एकाच वेळी आल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही कर्तव्य अत्यावश्यक सेवेत येत असल्याने नेमके प्राधान्य कशाला द्यावे, या विवंचनेत शिक्षक अडकले आहेत. कामाचा ताण वाढल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य हरवू लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरमध्ये दहावी बारावीचे वर्ष महत्वाची आहेत. या परीक्षा जवळ आल्यामुळे सध्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांची लगबग सुरू झाली आहे. हॉल तिकिटांचे वितरण सुरू आहे. अशातच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची लगीनघाई जोमात सुरु आहे. शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनाची कामे देण्यात आली आहेत. बोर्ड परीक्षांच्या तयारीसोबत कामकाज करताना शिक्षकांची मात्र कसरत होत आहे. कामाचा ताण वाढला असून इतर वर्गांचे शालेय कामकाज कोलमडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्ष्ाणिक नुकसान होत आहे.
यावर्षी बारावीची बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च तर दहावीची 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होत आहे. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बोर्ड परीक्षांची तयारीसाठी लगबग सुरु आहे. अशातच राज्यभरात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणुकांची धामधूम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरून छाननी झाली आहे. अर्ज माघारीसाठी तीन दिवस उरले आहेत. रविवार-सोमवार शासकीय सुटी राहणार आहे.
सध्या अर्ज माघारीनंतर लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांचीच माहोल निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवार अन् मतदानावर चर्चा रंगत आहेत. या निवडणूक कामकाजात शिक्षकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. त्यामुळे या शिक्षकांना निवडणुकांचे प्रशिक्षण विविध टप्प्यांमध्ये 30 जानेवारीपर्यंत दिले जाणार आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षेत बोर्डाच्या नियमानुसार दररोज परीक्षा घेऊन त्याच दिवशी ऑनलाईन गुण भरणे बंधनकारक आहे. ही प्रात्यक्षिक परीक्षा संच मांडणी व अन्य कामांसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी आवश्यक आहेत. मात्र निवडणूक प्रशासनाने सर्वच कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. शैक्षणिक कामकाज, लोकशाही उत्सवातील सहभाग दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने नक्की कोणते कर्तव्य आधी पार पाडावे, असा पेच शिक्षकांपुढे उभा राहत आहे. कामाचा ताण वाढल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य हिरावत आहे.