

रत्नागिरी : धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान असलेल्या सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने श्री रत्नागिरीचा महागणपती माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव गुरुवार, 22 जानेवारी ते बुधवार, 28 जानेवारी या कालावधीत होणार असून, उत्सवात दररोज धार्मिक विधी, भजन-कीर्तन, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या माघी गणेशोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा उत्सवाची सुरुवात गुरुवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता श्रींच्या विधी विधिवत प्राणप्रतिष्ठापनेने होणार आहे. तर रात्री 8 वा. बुवा उदय मेस्त्री आणि श्री स्वामी समर्थ प्रसादिक भजन मंडळ, केळ्ये यांच्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय होणार आहे.शुक्रवार, 23 जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा असून संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री 8 वा. बुवा श्री. गौरव पांचाळ व साई प्रसादिक भजन मंडळ, फुणगूस यांच्या भजनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.शनिवार, 24 जानेवारी रोजी कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांचे सकाळी 9 वा. अथर्वशीर्ष पठण तर सायंकाळी 7 वा. ह.भ.प. श्री प्रवीण मुळ्ये यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून, कीर्तनाचा विषय गणेश पुराण सार असा असेल. कार्यक्रमातून गणेशभक्तांना अध्यात्मिक ज्ञानाची पर्वणी मिळणार आहे. 25 जानेवारी 2026 या दिवशी सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 8 वा. मंडळातर्फे सांबरे हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर होईल.