

रायगड : अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील पुरातन श्रीसिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंतीनिमित्त आज (1 फेब्रुवारी) माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. कुलाबा किल्ला सार्वजिक गणेशोत्सव समितीसह अलिबागमधील गणेशभक्तांतर्फे गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दिवसभरात सुमारे 50 हजाराहून अधिक भाविक येथील श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतात.
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आंग्रेकालीन ’गणेश पंचायतन’ मंदिर अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यात आहे. किल्ल्यातील पोखरणीच्या (तलावाच्या) पश्चिमेस हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या गाभार्यात मध्यभागी दगडी चौथर्यावर उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक गणपती, पुढील बाजूस डावीकडे ’सांब’ तर उजवीकडे ’विष्णू’ आणि मागील बाजूस डावीकडे ’सूर्य’ तर उजवीकडे ’देवी’ अशा एकूण पाच मूर्तीच्या या समूहास गणेश पंचायतन असे संबोधले जाते. संपूर्ण काळ्या दगडातील हे मंदिर थोरल्या राघोजी आंग्रे यांनी बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी व उजव्या बाजूस गणपतीची प्रतिमा आहे. मंदिराचे सभागृहसुद्धा अष्टकोनी आहे.
अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दर्शनाकरिता भक्तांचा जनसागर उसळतो. राज्यातील या एकमेव गणेशपंचायतनाच्या दर्शनाकरीता माघी गणेशोत्सवात राज्यातील विविध जिल्ह्यातून गणेशभक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाचे सुरेख आयोजन केले होते. नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे गणेश पंचायतन असल्याची मोठी श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनाकरिता आले होते. दर्शनाच्यावेळी भावीकांची कोणतीही अडचण होवू नये तसेच दर्शन देखील शांतपणे घेता यावे याकरिता भाविकांच्या रांगांकरिता विशेष नियोजन करण्यात येते. रांगेतून आलेल्या भावीकांना थेट गणेश गाभार्यापर्यंत पोहोचून थेट दर्शन घेता येईल तसेच प्रदक्षिणे अंती थेट महाप्रसाद घेण्याकरीता महाप्रसाद मंडपात पोहोचता येईल याकरित एका तात्पूर्त्या पूलाची उभारणी करण्यात येते. माघी गणेशोत्सवाच्या दिवशी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी असते.
कुलाबा किल्ल्यातील गणेशोत्सवासाठी समितीमार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त येथे दिवसभरात सुमारे 50 हजाराहून अधिक भाविक भेट देतात. गणेश दर्शनासाठी येणार्या भाविकांना विविध सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. श्रीसिद्धीविनायक मंदिरात सकाळी काकडारती, अभ्यंग स्नान, अभिषेक होईल. सकाळी दहा वाजता ते दुपारी 12 वाजेपर्यंत कीर्तन व दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी गणेश जन्मोत्सव होईल.
किशोर अनुभवणे, सदस्य, कुलाबा किल्ला सार्वजिक गणेशोत्सव समिती.