

आशिष देशमुख
पुणे: राज्य सरकारने यंदापासून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव जाहीर करताच संपूर्ण देशासह जगात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. संपूर्ण देशात एक ते दीड लाख कोटी तर महाराष्ट्रात 50 ते 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल यंदाच्या उत्सवात दिसेल, असा अंदाज असोचेम (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया) ने दिला आहे. हा उत्सव देशभरातील लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन बनला आहे, असे मत या अंदाजात व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सकारात्मक परिणाम अवघ्या देशासह जगावर झालेले दिसत आहेत. त्यामुळे या उत्सवकाळात यंदा विक्रमी उलाढाल अपेक्षित आहे. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, गणेश मंडळांच्या देणग्या, देखावे यांसह फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुडस (रोज लागणाऱ्या वस्तूंची) मोठी खरेदी सुरू आहे. (Latest Pune News)
तसेच, सराफा, कापड, इलेक्ट्रानिक बाजारात मोठी उलाढाल दिसत आहे. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी आहे. तसेच, गणेशोत्सवात सर्वप्रकारची वाहनखरेदी मोठ्या प्रमाणावर यंदा होत आहे. यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकीसह व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घर खरेदी आणि बुकींगही मोठ्या प्रमाणावर झाल्याचे वृत्त आहे.
असोचेमच्या अहवालातील मुद्दे
देशभरात एक ते दीड लाख कोटी तर महाराष्ट्रात 45 ते 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या उलाढालीचा अंदाज.
सर्वेक्षणानुसार 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या 54 टक्के मोठ्या कंपन्यांचा निर्यातीत सहभाग.
ऑटोमोबाईल घटक, ऊर्जा, आयटी, आयटीईएस, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स यासारख्या क्षेत्रांमध्ये उलाढाल वाढली.
किरकोळ व्यवसायात 47 टक्के वाढ.
महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांतून अनेक क्षेत्रांमध्ये मोठी उलाढाल.
पश्चिम बंगाल, गोवा आणि केरळसारख्या इतर राज्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मुंबई, पुण्यात उधाण, मोठ्या मंडळांच्या बाप्पांना दागिन्यांचा साज.
दागिन्यांमध्ये हिरे, माणिक- मोत्यांचाही समावेश आहे.
मॉलमध्ये येणार्यांची संख्या 50 ते 70 टक्क्यांनी वाढली आहे.
रिअल इस्टेटमध्ये चांगली कामगिरी सुरू आहे.
उत्सवाचा आर्थिक परिणाम मूर्ती बनवणार्या आणि सजावट करणार्यांपासून ते मिठाई विक्रेते आणि वाहतूक सेवांपर्यंत पसरलेला आहे.
आर्थिक भरभराट एकाच क्षेत्रापुरती मर्यादित नाही. तर त्यात किरकोळ विक्री, उत्पादन (मूर्ती, सजावट, मिठाई), पर्यटन, स्थानिक वाहतूक आणि नवीन वाहनविक्रीचा समावेश आहे. हा उत्सव लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन बनला आहे.
उत्सवाचे मूळस्थान असलेल्या महाराष्ट्रात लक्षणीय परिवर्तन अनुभवायला मिळत आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरातील आर्थिक घडामोडींमध्ये मोठी वाढ दिसत आहे.
मंडप व्यवसाय, सजावट करणारे, इलेक्ट्रिशियन, केटरर्स, इव्हेंट कंपन्यांना मागणी निर्माण होते.
मुंबई, पुणे, अहमदाबाद सारख्या शहरांमधील मॉल्समध्ये मोठी गर्दी दिसत आहे.
रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी हा उत्सव शुभ काळ मानला जातो. त्यामुळे या व्यवसायात मोठी तेजी दिसत आहे.