

Raipatan Upper Tehsildar Office
राजापूर : राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालयास शासनाने मंजुरी दिल्याने राजापूरच्या पूर्व विभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत खडीकोळवणचे सरपंच प्रवीण रहाटे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत जनतेसाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
राजापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून त्याचा पूर्व विभाग सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत पसरलेला आहे. रायपाटण तालुका निर्मितीची मागणी सुमारे ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच विधानसभा व विधानपरिषदेतील लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावासाठी मुख्यमंत्री व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
गेल्या २५ ते ३० वर्षांत राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून या विषयावर अनेकदा चर्चा झाली. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या प्रस्तावित तालुक्यांच्या यादीत रायपाटणचा समावेश करण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर आणि शासनाच्या नव्या धोरणानुसार रायपाटण ग्रामपंचायतीने सन २०२० मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केला होता.
सध्या महसूल कार्यालयाच्या कामांसाठी नागरिकांना २५ ते ६० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळेचा अपव्यय तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. राजापूर पूर्व विभागातील ३२ गावांतील नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत राज्य शासनाच्या महसूल विभागाने शासन निर्णयाद्वारे रायपाटण अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापनेस मंजुरी दिली आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयाला कोणत्याही प्रकारचा विरोध करून जनतेच्या हिताचे नुकसान होऊ नये, असे आवाहन प्रवीण रहाटे यांनी केले आहे. अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या स्थापनेची ही संधी दवडली गेल्यास त्याचा मोठा फटका परिसरातील नागरिकांना बसू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.