Ratnagiri News : संततधार पावसाने मंडणगडकर सुखावले

कृषी विभागाचा पेरणीचा सल्ला; आधीच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता मिटली
Ratnagiri News
संततधार पावसाने मंडणगडकर सुखावले
Published on
Updated on

मंडणगड : मंडणगड तालुक्यात सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने मंगळवारी सायंकाळपर्यंत हजेरी कायम ठेवल्याने तालुकावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत झालेला पाऊस पेरणीयोग्य असल्याचे सांगत कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणी व शेतीकामे सुरू करण्याचे आवाहन केले आहे. यंदा जून महिना अर्ध्याहून अधिक संपत आला, तरी मान्सून सक्रिय न झाल्याने उष्णता आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र सलग पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक वेळेनुसार खरीप हंगामासाठी पेरणी उरकली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवण आणि पिकांच्या वाढीबाबत चिंता निर्माण झाली होती. आता झालेल्या पावसामुळे ही चिंता दूर झाली असून मंगळवारी सकाळपासून अनेक शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाच्या आगमनामुळे बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. छत्री, रेनकोट, प्लास्टिक कागद आणि अन्य पावसाळी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून आली.

दरम्यान, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी या सरींमुळे समाधान व्यक्त केले आहे. खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून पेरणीसह अन्य शेतीकामांसाठी आवश्यक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच दमदार सरींमुळे पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जलस्रोतांमध्येही पाण्याची भर पडण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news