

राजापूर : शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या ब्रिटीशकालीन वखारीच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेले काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गेली दोन वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये वखारीचे बाह्य संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण जवळपास पूर्ण झाले सध्या अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच राजापूरकरांना या ऐतिहासिक वास्तूचे नव्या रूपातील दर्शन घडणार आहे.
इतिहास अभ्यासकांच्या माहितीनुसार, इंग्रजांनी उभारलेली ही वखार सुमारे १६४९ च्या काळात अस्तित्वात आली. त्या काळी राजापूर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांच्यातील सत्तासंघर्ष तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीवर अस्थिरता होती. सन १६६१ मध्ये शिवाजी महाराजांच्या मोहिमेनंतर ही वखार बंद पडल्याची नोंद आढळते. त्यानंतर १६६८ मध्ये ती पुन्हा सुरू झाली, मात्र १६७० मध्ये पुन्हा बंद पडली. पुढे १७०२ मध्ये सुरू झालेली वखार सुमारे १७१० च्या आसपास कायमची बंद झाल्याचा इतिहास अभ्यासकांचा कयास आहे. ब्रिटिश प्रवासी अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी १७२७ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘A New Account of the East Indies’ या ग्रंथातही राजापूरचा उल्लेख आढळतो.
एकेकाळी राजापूरच्या व्यापारी वैभवाचे प्रतीक असलेली ही वखार कालांतराने दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र गेल्या काही वर्षांत शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी तिच्या पुनरुज्जीवनासाठी आवाज उठवला. या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जतन करत ‘शिवसृष्टी’ उभारण्याची मागणीही करण्यात आली होती. ‘माय राजापूर’ संस्थेने यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून शासनाकडे निधीची मागणी केली होती. या कामासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित इंग्रजकालीन वखार (राजापूर गढी) संवर्धन व परिसर सुशोभिकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून २०२४ मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. २०२५ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
लगतच्या इमारती आणि बुरुजांच्या दुरुस्तीची गरज
वखारीचे सुशोभिकरण होत असले तरी परिसरातील इतर ऐतिहासिक संरचनांची अवस्था चिंताजनक असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. वखारीलगतच्या पुरातन इमारती, तटबंदी आणि दोन्ही बाजूंचे बुरुज ढासळलेल्या अवस्थेत असून त्यांची तातडीने डागडुजी होणे आवश्यक आहे. तसेच वखारीच्या समोरील भागाचेही सुशोभिकरण करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज असल्याने शासनाने यासाठी स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्यात तटबंदी कोसळल्यास घराला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण तटबंदीचे तळापासून पुनर्बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पर्यटन विभागाच्या उपअभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजापूरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सुरू असलेले वखार संवर्धनाचे काम निश्चितच महत्त्वाचे मानले जात असले, तरी संपूर्ण गढी परिसराचे संवर्धन आणि संरचनात्मक सुरक्षितता याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.