

Ratnagiri weather update: मे महिन्याच्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना आज सकाळी अवकाळी पावसाच्या रिमझिम सरींनी दिलासा दिला आहे. पहाटे झालेल्या या पावसामुळे वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण झाला असला, तरी हवामान खात्याने दुपारनंतर पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पहाटे चालण्यासाठी किंवा कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची या अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.
कोकण किनारपट्टीवर हवेतील आर्द्रता तब्बल ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा आणि घामाच्या धारा कायम असून, तापमानातही ३ ते ४ अंशांची वाढ झाली आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या हवामानातील या अनपेक्षित बदलांमुळे मिश्र वातावरण तयार झाले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, डीहायड्रेशनचा (निर्जलीकरण) धोका वाढला आहे.
हवामान विभागाने दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे. वाढलेली आर्द्रता आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना गरज असल्यासच दुपारी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
मिश्र हवामानामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.