

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळालेल्या मालेगावकरांना सोमवारी (दि. १३) पुन्हा कडक उन्हाचा सामना करावा लागला. शुक्रवारी ३७.६ अंश सेल्सिअस असलेले तापमान सोमवारी थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. अवघ्या चार दिवसांत तापमानात तब्बल साडेचार अंश सेल्सिअसने वाढ झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेचा चटका बसू लागला आहे.
सोमवारी या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. येथे उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते. राज्यातील प्रमुख उष्ण शहरांमध्ये मालेगावचा समावेश होत असून, दरवर्षी एप्रिल मे महिन्यांत येथे तापमानाचा पारा झपाट्याने वाढतो.
फेब्रुवारी अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीपासून तापमान वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यावर्षी दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात दोन टप्प्यांत किमान पाच अंशांची घट झाली होती. त्यामुळे काही दिवस मालेगावकरांना गारव्याचा अनुभव आला होता. गेल्या आठवड्यात तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर होते. ढगाळ वातावरण आणि वाऱ्यामुळे उन्हाळा काहीसा सुसह्य झाला होता. मात्र, अवकाळीचे वातावरण ओसरताच तापमानात अचानक वाढ झाली.
अवघ्या २४ तासांत तापमानात वाढ होत शनिवारी आणि सोमवारी नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. यापूर्वी १४ मार्च आणि २८ मार्च रोजी या हंगामातील प्रथमच ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमान घसरले होते.
आता पुन्हा तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, पुढील आठवड्यात तापमान ४२ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परिणामी नेहमी वर्दळीचे असणारे शहरातील मुख्य रस्तेही भरदिवसा निर्मनुष्य दिसत आहेत. दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी लागू असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
मालेगाव महानगरपालिकेतर्फे उष्माघात टाळण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात तापमान तुलनेने कमी असतानाही अचानक झालेल्या वाढीमुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असून पुढील काही दिवस उकाडा वाढण्याची शक्यता आहे.