

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या विविध तक्रारींचे पुढे काय झाले व आपण दिलेल्या तक्रारीचा पुढे तपास कसा होत आहे, याबाबत तक्रारदाराला माहिती देणे सुलभ करण्याच्या उद्देशाने ‘मिशन प्रगती’ हा विशेष लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने हा विशेष लोकाभिमुख उपक्रम 10 जुलै 2025पासून अंमलात आणला आहे.
या मिशन अंतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व एफआयआर संदर्भात तक्रादारांना-फिर्यादींना तपासाची सद्यस्थिती व्हॉटसॲप व एसएमएसच्या माध्यमातून थेट कळवण्यात येते. या ‘मिशन प्रगती’ अंतर्गत आतापर्यंत जवळपास 1,450 फिर्यादींना रत्नागिरी पोलिस दलामार्फत 4,508 संदेश हे व्हॉटसॲप व एसएमएसच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक केल्याची माहिती, आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 अन्वये नोटीस देण्यात आलेली आहे. अथवा गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्यात आलेली आहे व तपासातील महत्त्वाच्या टप्प्यांबाबत अद्ययावत माहिती या ‘मिशन प्रगती’ अंतर्गत व्हॉटसॲप व एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. या मिशनचे कामकाम हे पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत नेमलेल्या 2 पोलिस अंमलदारांमार्फत करण्यात येत आहे.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने नागरिक-केंद्रित पोलिसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल ॲप्लिकेशन्स सुरू केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अनेकवेळा नागरिकांनी दाखल केलेल्या आपल्या तक्रारी अथवा एफआयआरचे पुढे काय झाले, त्या तक्रारींचा तपास पुढे कुठपर्यंत पोहोचला आहे, कार्य कार्यवाही झाली आहे, याबद्दल ते अनभिज्ञ असतात व त्याबद्दल त्यांना पुढे अधिक माहिती मिळत नाही. जेवढ्या एमआयआर जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्यास आहेत किंवा दाखल होत आहेत व एफआयआर दाखल झाल्यानंतर आपल्या दिलेल्या तक्रारींचा तपास पुढे कसा होत आहे किंवा तपास कसा पुढे सरकत आहे, काय कार्यवाही झाली आहे, याची माहिती तक्रारदारास वेळेवर मिळत नाही व त्यासाठी बऱ्याचवेळा तक्रारदाराला-फिर्यादीला संबंधित पोलिस ठाण्यात जावे लागते व वारंवार पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात अनावश्यक त्रास सहन करावा लागतो.
हा त्रास टाळण्यासाठी तसेच तक्रारींच्या तपासाची पारदर्शक व वेळेवर माहिती मिळावी आणि तपास पुढे कसा होत आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलिस दलाने ‘मिशन प्रगती’ हा उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील सर्व तक्रारदारांना-फिर्यादींना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी ‘मिशन प्रगती’ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांचा लाभ घ्यावा. तसेच पाठवण्यात येणारे व्हॉटसॲप व एसएमएस संदेश हे केवळ त्यांच्या दाखल तक्रारीबद्दल गुन्ह्याच्या तपासाबाबत वेळोवेळी अद्ययावत माहिती देणे आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दल नागरिकांच्या तक्रारी प्रभावी, पारदर्शक व वेळेत मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच ‘मिशन प्रगती’ या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथ्ावा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.