

तासवडे टोलनाका : स्वतः पोलिस दलात निरीक्षकपदी कार्यरत असतानाच पोलिस विभागात आपल्यापेक्षा मोठ्या पदावर आपलीच मुलगी जर पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) म्हणून निवड झाली तर जीवनात यापेक्षा कोणतेच सार्थक नाही. अशीच घटना घडली असून तळबीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण भोसले यांची लेक सायली भोसले महाराष्ट्र लोकसेवक आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसरी आली. तिने पोलिस दल निवडले असून तिची डीवायएसपीपदी निवड झाली आहे. डीवायएसपी झालेल्या लेकीला पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी अभिमानाने सॅल्यूट केला. विशेष म्हणजे भोसले कुटुंबीयांची ही चौथी पिढी पोलिस दलात कार्यरत झाली आहे. भोसले कुटुंबांच्या रक्तातच देशसेवा भिनली आहे.
कसबा बावडा येथील सायली रूपाली किरण भोसले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी मधून इएनटीसी ही इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. दरम्यान सायली हिचे वडील किरण भोसले हे तळबीड (ता. कराड) या ठिकाणी पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहे. त्यांनी आपली मुलगी उच्च शिक्षण घेऊन क्लास वनअधिकारी करण्यासाठी स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्यांनी पोलिस महानिरीक्षक अभिनव देशमुख यांचे बंधू संकल्प देशमुख यांच्याकडे सलग चार वर्षे ऑनलाईन क्लासेस व स्वतःच्या घरी अतिशय जिद्दीने अभ्यास केला.
खडतर अभ्यास सतत वाचन आणि अधिकारी बनण्याची जिद्द या तिन्ही गोष्टीमुळे सायली भोसले यांनी 2024 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. दरम्यान पोलिस निरीक्षक किरण भोसले यांचे आजोबा व वडील हे दोघेही पोलिस दलात होते. तर स्वतः किरण भोसले कराड तालुक्यातील तळबीड या ठिकाणी सध्या पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. भोसले कुटुंबाचा हा आदर्श समाजातील इतर कुटुंबांनी घेण्यासारखा आहे.