

Ratnagiri Municipal Council to Earn 20.82 Lakh rupees Through Revenue Collection Contract
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या कडेला बसून फळे, भाजी व इतर वस्तू विक्री करणाऱ्यांकडून रत्नागिरी नगर परिषदेला आगामी वर्षासाठी २० लाख ८२ हजार ७३९ रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या विक्रेत्यांकडून फी वसूल करण्यासाठी लिलाव बोलीने मक्तेदार निश्चित झाले आहेत. लिलाव बोलीनुसार जी रक्कम मक्तेदाराने नगर परिषदेकडे जमा करायची आहे ती पूर्ण रक्कम भरली गेल्यानंतरच संबंधीत मक्तेदाराला फी वसूली करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
मंगळवार आठवडाबाजारातील फी वसूलीच्या बोलीसाठी ७ मक्तेदारांनी भाग घेतला. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ३ हजार ५८३ रुपयांची बोली लावणाऱ्या मक्तेदाराला हा मक्ता मिळाला आहे. माळनाक्याच्या वरच्या भागात म्हणजेच माळनाका ते कोकणनगर, साळवी स्टॉप, नाचणे, मारूती मंदिर भाजी व मच्छी मार्केटमध्ये फी वसूली करण्यासाठी सर्वाधिक ४ लाख ३० हजार ९११ रुपयांची बोली लावणाऱ्यास हा मक्ता मिळाला आहे.
या लिलावामध्ये ५ मक्तेदारांनी भाग घेतला होता. माळनाक्याच्या खालच्या भागातील सर्व बाजारपेठांमध्ये फी वसूलीसाठी ४ मक्तेदारांनी भाग घेतला. यामध्ये सर्वाधिक १२ लाख ४८ हजार २४५ रुपयांची बोली मान्य झाली आहे. शनिवार आठवडाबाजार आणि बाजारपेठेतील मच्छि मार्केटमधील फी वसूलीसाठी बोली लावणारे मक्तेदार पात्र नसल्याने लिलावाच्या त्या दोन्ही प्रक्रिया रद्द झाल्या आहेत.
ज्या मक्तेदारांना फी वसूलीचा मक्त्ता मिळाला आहे त्यांच्याकडून प्रथम लिलाव बोलीची पूर्ण रक्कम भरून घेण्यात आल्यानंतरच फी वसूली पावती करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यापूर्वी ज्यांना मक्ता मिळाला त्यांनी एकरकमी बोलीची रक्कम न भरल्याने कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेने सर्व रक्कम भरून घेतल्याशिवाय फी वसूलीची परवानगी देवू नये असा ठराव केला आहे. हा मक्ता एक वर्षासाठी आहे.