

Online Fraud Case
रत्नागिरी : परदेश पर्यटन आणि ऑनलाइन ड्रेस खरेदीच्या आमिषाने रत्नागिरीतील तीन महिलांची तब्बल २२ लाख ७१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये शहर पोलिस ठाण्यात एका संशयितासह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थिबा पॅलेस रोड येथील समृद्धी सुदेश मयेकर (४५), माजी नगराध्यक्षांच्या पत्नी व आजी नगरसेविका वैभवी विजय खेडेकर तसेच मिरजोळे येथील सई प्रथमेश बांडावे (३७) या फसवणुकीच्या बळी ठरल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत त्यांनी आणि त्यांची मैत्रीण वैभवी खेडेकर यांनी ‘मेक माय टूर एक्स’ या नावाने सुरू असलेल्या टूर कंपनीमार्फत टर्की-इस्तांबुल सहलीसाठी संपर्क साधला होता. यावेळी संशयित संदीप कुमार (रा. रोहिणी सेक्टर, पश्चिम दिल्ली) याने विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार समृद्धी मयेकर यांनी ५ लाख रुपये, तर वैभवी खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सहलीसाठी ७ लाख ४० हजार रुपये भरले. मात्र, संपूर्ण रक्कम स्वीकारूनही आरोपीने त्यांना परदेश दौऱ्यावर न पाठवता फसवणूक केली.
दुसऱ्या प्रकरणात, मिरजोळे येथील सई बांडावे यांनी इन्स्टाग्रामवरील जाहिरात पाहून ऑनलाइन ड्रेसची ऑर्डर दिली होती. त्यांनी सुरुवातीला ड्रेससाठी १ हजार रुपये गुगल पेद्वारे भरले. त्यानंतर स्वतःला ‘ई-कार्ट’ कंपनीचा प्रतिनिधी सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून पार्सल आल्याचे सांगितले. पार्सल सोडविण्यासाठी सरकारी शुल्क, प्रक्रिया शुल्क आणि इतर विविध कारणे सांगत वेळोवेळी पैसे मागितले. त्यावर विश्वास ठेवून सई बांडावे यांनी एकूण १० लाख ३१ हजार २०९ रुपये ऑनलाइन भरले. मात्र, पार्सल न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या दोन्ही प्रकरणांतील पीडित महिलांनी ३ जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संदीप कुमार आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.