

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात वाजत-गाजत लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन केले असून आतापर्यंत २ हजार बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे ज्या गणेशभक्तांनी तिकीट काढले नाही, त्यांनी तातडीने ऑनलाईन तिकीट काढावे असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात प्रत्येक कोकणकर आपल्या मूळगावी नक्की येतोच. यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणार आहे. तीन दिवसात तब्बल ३ हजार एसटी बसेसने लाखोंच्या संख्येने चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. वर्षभर बंद असलेली घरे कोकणकरांनी उघडली असून गर्दीने गावे गजबजली आहेत.
दरम्यान, लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांना मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणी जाण्यासाठी परतीचे वेध लागत असते. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन केले आहे.
मागील २० दिवसांपूर्वीच एसटी बसेसचे आरक्षण खुले केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत २ हजार एसटी बसेस बुक झाल्या असून त्यापैकी ८०० बसेस ग्रुप बुकिंगच्या आहेत. आणखी काहीच बसेस शिल्लक असून लवकरात लवकर प्रवाशांनी तिकीट बुकिंग करावे असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले. गणेश विसर्जनानंतर रत्नागिरी विभागातून तब्बल अडीच हजार बसेस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
गणेशोत्सवात यंदाच्या वर्षी महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत असणार आहे. महिला, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत असणार आहे.
मुंबईतून आलेले बस - ३ हजार बसेस
परतीच्या प्रवासासाठी - २,५०० बसेस
आतापर्यंत आरक्षण - २ हजार बसेस
समूह आरक्षण - ८००
परतीचा प्रवास - गौरी गणपती, विसर्जनानंतर
"चाकरमान्यांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांनी यंदाही लालपरीलाच पसंती दिली आहे. परतीच्या प्रवासासाठी २ हजार बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे."
- आश्र्वजीत जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी