

पोलादपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बडोदा रेल्वे डिव्हिजनने सुरू केलेल्या बडोदा-रत्नागिरी विशेष रेल्वेला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना ही सेवा केवळ सणापुरती का? असा सवाल उपस्थित करत ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू करण्याची जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र युवक संघटनेने केली आहे.
या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष विजय श्रीपत जाधव, किशोर केसरकर तसेच महाड-पोलादपूर तालुक्यातील मराठा समाजातील २५२ गावांचे अध्यक्ष यांच्या वतीने बडोदा रेल्वे विभागाच्या डी आर एम यांना निवेदन सादर करण्यात आले.
बडोदा आणि गुजरात परिसरात महाराष्ट्रातील हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर भागांशी त्यांचे सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे वर्षभर या मार्गावर प्रवाशांची गरज आहे. गणेशोत्सव, दिवाळी, होळी, उन्हाळी सुट्ट्या, लग्नसमारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी वारंवार कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कायमस्वरूपी रेल्वेसेवा मिळणे ही काळाची गरज आहे.
अखिल महाराष्ट्र युवक संघटनेचे अध्यक्ष विजय श्रीपत जाधव यांनी रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून बडोदा-रत्नागिरी मार्गावर नियमित सेवा सुरू करावी, अशी मागणी केली.
या मागणीला महाड-पोलादपूर तालुक्यातील मराठा समाजातील २५२ गावांच्या अध्यक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे ही केवळ एका संघटनेची मागणी नसून कोकणातील प्रवाशांच्या मूलभूत वाहतूक गरजेशी संबंधित प्रश्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बडोदा-रत्नागिरी रेल्वे कायमस्वरूपी झाल्यास गुजरातमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसह कोकणातील हजारो कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण, प्रवासाचा वेळ आणि प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल. गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे सुरू करून प्रवाशांची गरज प्रशासनाने मान्य केली आहे. मग हीच गरज वर्षभर असताना सेवा केवळ काही दिवसांपुरती का? हा प्रश्न आता रेल्वे प्रशासनासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे बडोदा-रत्नागिरी विशेष रेल्वे तात्पुरती ठेवण्याऐवजी कायमस्वरूपी नियमित रेल्वे सेवेत रूपांतरित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कोकणवासीयांचा प्रवास सणापुरता नाही; त्यांची रेल्वेची गरजही सणापुरती नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या मागणीवर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे बडोदा, गुजरात तसेच रायगड-रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
कोकणाला जोडणारी रेल्वे सेवा हवी
गणेशोत्सव आला की मुंबई, गुजरात आणि देशाच्या विविध भागांत रोजगार, व्यवसाय व शिक्षणासाठी स्थायिक झालेला कोकणवासीय आपल्या मातीच्या ओढीने गावाकडे धाव घेतो. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या आणि मर्यादित वाहतूक व्यवस्था यामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर बडोदा-रत्नागिरी विशेष रेल्वे सुरू झाल्याने गुजरातमधील कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोकणवासीयांचा प्रवास केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही. मग रेल्वे सेवा मात्र सणापुरतीच का? असा थेट सवा उपस्थित करण्यात आला आहे.