

रत्नागिरी : जिल्ह्यात चार नगर परिषद व तीन नगर पंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका होत असून सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली दिसत आहे. तिरंगी, चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 21 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून या दिवशी किती उमेदवार रिंगणात राहणार व किती ठिकाणी बंडखोरी होणार हे स्पष्ट होणार आहे. शेवटच्या दिवशी उमेदवरी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते.
रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज दाखल झाले तर नगरसेवकपदासाठी तब्बल 89 अर्ज दाखल झाले. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत नगराध्यक्षपदासाठी एकूण सात तर 32 जागांसाठी एकूण 132 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रत्नागिरीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जीवन देसाई काम पाहात आहेत.देवरूख नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी सातव्या दिवशी 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 34 अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात व नगरसेवक पदासाठी 81 अर्ज दाखल झाले आहेत.
गुहागर नगर पंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 24 असे एकूण 26 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी दिली. शेवटच्या दिवस अखेर नगराध्यक्षपदासाठी सात आणि 17 नगरसेवकपदासाठी 56 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची अक्षरशः झुंबड उडाली. महायुतीतर्फे शिंदे सेनेचे उमेश सकपाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे मिलिंद कापडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 13 उमेदवारांनी अर्ज भरले असून नगरसेवक पदासाठी एकूण 154 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राजकीय पक्षांची घासाघीस सुरू राहाणार आहे. यामध्ये महायुती व आघाडीला यश मिळाले तर उमेदवारांची संख्या कमी होईल; अन्यथा चिपळूणमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळेल.
खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरंभापासूनच रंगलेल्या राजकीय रणसंग्रामात सोमवारी नामनिर्देशनाचा अंतिम दिवस गजबजून गेला. दिवसभरात मोठ्या संख्येने उमेदवारांनी दाखल केले आहे. नगरसेवक पदासाठी तब्बल 82 अर्ज, तर नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवार मैदानात उतरल्यानंतर खेडच्या राजकारणात चुरस कमालीची वाढल्याचे दृश्य पाहायला मिळाले. राजापूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी 5 तर 20 नगरसेवकपदासाठी 69 अर्ज दाखल झाले आहेत. लांजामध्ये नगराध्यक्षदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून 1, भाजपकडून 1, उबाठाकडून 2, अपक्ष तीन अर्ज दाखल झाले आहेत तर 20 नगरसेवकपदासाठी अपक्ष 20, शिवसेना शिंदे 15, काँग्रेस 5, उबाठा 1, भाजप 2, असे 49 अर्ज दाखल झाले आहेत.