

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी नामनिर्देशनपत्र भरायच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 89 उमेदवारी अर्ज भरण्यात आले. रत्नागिरीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसत आहे.
शेवटच्या दिवशी 28 अपक्षांनी अर्ज दाखले केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 21, शिवसेना शिंदेंकडून 16, प्रहार जनशक्तीकडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 13, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पाच, काँग्रेसने तीन तर बसपने एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून शेवटच्या दिवशी उमेदवारांनी एकत्र अर्ज दाखल केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत स्वत: उपस्थित होते. महायुतीचे अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते. उबाठाकडून माजी आमदार व उपनेते बाळ माने यांची उपस्थिती होती.
शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवानी सावंत-माने, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून वाहिदा बशीर मुर्तुझा, अपक्षांमध्ये संध्या कोसुंबकर, प्राजक्ता किणे, तौफिका इफ्तीकार मजगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.