

Ratnagiri Khed Lote MIDC
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत पी-फास (PFAS) केमिकल निर्मितीच्या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापले असून, पी-फास केमिकल तयार करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला तात्काळ टाळे ठोकावे, अशी आक्रमक मागणी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. या मागणीसाठी गुरूवारी (दि. ८) लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात एक्सेल फाटा येथून करण्यात आली. यावेळी कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी १२ वाजता मोर्चा कंपनीच्या मुख्य गेटवर पोहोचताच पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला.
यावेळी बोलताना माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले, “कोकणातील जनतेच्या जीवनाशी, आरोग्याशी आणि निसर्गाशी खेळ करू नका,” असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पी-फास केमिकल हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचा आरोप करत, अशा रसायन उद्योगांना कोकणात परवानगी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, इटलीत सहा वर्षे तुरुंगवास भोगून आलेला एक अधिकारी लोटे येथील कंपनीत कार्यरत असल्याचा गंभीर आरोपही दलवाई यांनी केला.
१९८६ साली स्थानिकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने उभारलेली लोटे औद्योगिक वसाहत आज स्थानिकांच्या मुळावर उठल्याचे चित्र दिसत आहे. लोटे परिसरातील अनेक ग्रामस्थांना कर्करोगासारखे गंभीर आजार बळावत असून, अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत ग्रामस्थांनी कंपनीच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले. कंपनीतील कंत्राटी कर्मचारी हृतिक साळवी यांच्या हातावर केमिकल सांडल्याने ते घरी गेल्यानंतर बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
दरम्यान, वेस्ट मॅनेजमेंट पॉलिसीमध्ये पी-फास रसायनांवरील योग्य प्रक्रिया राबविल्याशिवाय कंपनीचे उत्पादन बंद करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली. आजच्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे लक्षात येताच आंदोलक अधिकच संतप्त झाले. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री. सणस, निवासी नायब तहसीलदार अमित इंगळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उत्कर्ष शिंदे, एमआयडीसीचे आरस पिंपळे, तर कंपनीकडून प्रोडक्शन हेड राजेश नाईक, प्रोडक्शन मॅनेजर पाटील व मॅनेजर पाटोळे उपस्थित होते.
या आंदोलनात माजी खासदार हुसेन दलवाई, संघर्ष समितीचे अशोक जाधव, उदय घाग, सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदूलकर, मल्हार इंदूलकर, पत्रकार सतीश कदम, अॅड. संकेत साळवी, सुबोध सावंत देसाई, तुळशीराम पवार, नीलेश भोसले, इब्राहिम दलवाई, अजीम सुर्वे, गुलाब राजे, फैसल देसाई, अल्पेश मोरे, शहानवाज शाह, डॉ. मधुकर शिंगे, केशव लांबे, बशीर बेबल, संजय बुरटे, राजू आंबरे, माजी सभापती गोवळकर आदी उपस्थित होते.
प्रशासन आणि कंपनीकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने हे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असून, २० जानेवारीपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास २१ जानेवारीपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिला आहे.