

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरूच ठेऊया, असा निर्धार मंगळवारी शहरातील सावकर सभागृहात झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच कंपनीविरोधात 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कंपनीच्या गेटवर होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आली असून, शहरातील बहादूरशेखनाका येथून रॅलीला सुरुवात होणार आहे.
या बैठकीत गेल्या काही वर्षापासून कोकण विभागात रासायनिक उद्योगांमुळे गंभीर वायू व जलप्रदूषण झाले असून एमआयडीसी परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार, कर्करोग व इतर दुर्धर आजार होत आहेत. यात आता इटलीमध्ये प्रदूषणामुळे हजारों लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली व साडेतीन लाख लोकांना अनेक रोगांनी बाधित केलेली मिटेनी कंपनी सध्या लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल या नावाने लोटे परशुराम येथे कार्यरत झाली आहे. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे बाधित होणार असल्याने ही कंपनी तातडीने बंद झालीच पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली.
या जीव घेणाऱ्या कंपनीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 8 रोजी पुकारलेले आंदोलन तितक्याच ताकदीने करुन एवढ्यावरच न थांबता ही कंपनी बंद होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच विषारी कंपनी, त्वरित हटवा, जीवसृष्टी वाचवा, हा राजकीय नाही, मानवतेचा लढा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या हे आंदोलन आपले जीव व निसर्ग वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात आमदार भास्कर जाधव, माजी आमदार, डॉ. विनय नातू पर्यावरणवादी उल्का महाजन, डॉ. मंगेश सावंत, सत्यजित सावंत त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार असल्याने नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी संघर्ष समितीचे अशोक जाधव, उदय घाग, सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदूलकर, मल्हार इंदूलकर, पत्रकार सतीश कदम, ॲड. संकेत साळवी, सुबोध सावंत -देसाई, तुळशीराम पवार, नीलेश भोसले, इब्राहिम दलवाई, अजीम सुर्वे, गुलाब राजे, फैसल देसाई, अल्पेश मोरे, शहानवाज शाह, डॉ. मधुकर शिंगे, केशव लांबे, बशीर बेबल, संजय बुरटे, अंकुश काते, चंद्रकांत चाळके, हुसैन ठाकूर, राजेंद्र आंबरे, सजीव ठसाळे, संदीप आंबरे आदी उपस्थित होते.