खेड : तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या कारभारात गंभीर अनियमिततेच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे-1 यांनी अधिकृतरीत्या चौकशी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
उपआयुक्त (कर्मचारी), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार संबंधित सोसायटीविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने शासन परिपत्रक क्र. दि. 21 सप्टेंबर 2025 तसेच शासन निर्णय अधीन राहून चौकशी करण्यात येणार आहे.या संदर्भातील मूळ तक्रारदार दीपक मोहिते यांच्या अर्जाचा प्राथमिक तपास करून पुढील चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. समाजकार्यात कार्यरत असलेल्या तक्रारदारांनी सोसायटीच्या कार्यपद्धतीत अनियमितता, कारभारातील सुसूत्रतेचा अभाव तसेच सदस्यांचे आर्थिक हित बाधित झाल्याची तक्रार केली होती.
या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, 2000 ते 2024 या कालावधीत सोसायटीच्या कारभारासंबंधी सर्व संबंधित कागदपत्रे, बैठकीचे ठराव व आर्थिक नोंदी तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित सोसायटीला देण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान आवश्यक कागदपत्रे विलंब न करता सादर करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले असून अनियमितता आढळल्यास पुढील शिस्तभंगात्मक कारवाईस तोंड द्यावे लागेल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत पुढील चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडून राज्य कार्यालयास पाठविण्यात येणार आहे. या कारवाईमुळे खेड तालुक्यातील सहकारी संस्थांच्या कार्यप्रणालीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी ही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.