

राजापूर :राजापूर तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात वाघाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती असलेली पोस्ट त्या गावातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. मृतदेहाचे विद्रूप स्वरूप, नदीपात्रात वाहत असल्याचे वर्णन आणि शरीराचे अवयव कापून नेल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मृतदेह वाघाचा नसून बिबट्याचा असल्याचे स्पष्ट केले. तसेच अवयव कापून नेल्याच्या गोष्टीत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
वनविभागाने घटना घडून बराच वेळ झाला तरी कोणतीही स्पष्ट नोंद केली नव्हती त्यामुळे उलटसुलट चर्चा अधिकच वाढत गेल्या. काही नागरिकांना हे संपूर्ण प्रकरण शंकेखोर वाटले, “जर घटना खरी असेल तर वनविभाग गप्प का?” असा सरळ सवाल उपस्थित केला गेला
दरम्यान, अधिकृत माहिती नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर संभ्रमित झाले होते. सोशल मीडियावरून येणाऱ्या पोस्टमुळे गोंधळ वाढत गेला. शनिवारी सायंकाळी उशीरा वनविभागाचे अधिकारी घटना स्थळाकडे रवाना झाले होते.
हा वाघाचा मृतदेह नसून बिबटयाचा आहे. मात्र त्याचे पंजे शाबूत असल्याचे सांगितले. (कापून नेल्याचे वृत्त खोटे आहे )आता पुढील कार्यवाही सुरु आहे. बिबटयाचा मृत्यू नेमका कसा झाला ते पशु वैद्यकीय अधिकारी त्याची तपासणी केल्यावरच सांगू शकतील. वाघाचा मृत्यू व त्याचे अवयव कापून नेले ही बातमी खोटी आहे. अशा पोस्टवर विश्वास ठेऊ नका.
जयराम बावधाने राजापूरचे वनअधिकारी