

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे परिसरात दोन गव्यांमध्ये झालेल्या भीषण झुंजीमध्ये एका मादी रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळच्या सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत गवा आढळल्याची माहिती मिळताच वन विभागाचे
अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मादी रानगव्याचा मागील उजवा पाय दुसऱ्या गव्याच्या शिंगात अडकून गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. घटनस्थळी आसपासच्या जमिनीवरही झुंजीच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या नंतर पशुधन विकास अधिकारी कडवई यांनी मृत रानगव्याचे शवविच्छेदन केले. जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदून लाकडाच्या सहाय्याने दहन करून मृत गव्याची मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. घटनास्थळी विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सूरज तेली, सुप्रिया काळे तसेच ग्रामस्थ संदेश जोगळे, अर्जुन जोगळे यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.