Ratnagiri | पावसाळ्यात महामार्गाचे 'दुःखणे' कायम!

Ratnagiri Highway - वेरळ घाटात तिसऱ्यांदा दरड; अंजणारीत डोंगरकडा कोसळला, महामार्गावर एकेरी वाहतूक
Ratnagiri
लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात अवघड वळणावर तिसऱ्यांदा दरड कोसळली. pudhari photo
Published on
Updated on

ratnagiri highway woes monsoon road condition

लांजा : सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला (एनएच-६६) बसला असून, लांजा तालुक्यातील वेरळ घाटात आठवडाभरात तिसऱ्यांदा दरड कोसळली, तर अंजणारी येथील ब्रह्मगिरी परिसरात डोंगरकडा थेट महामार्गावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही ठिकाणी महामार्गावरील एक मार्गिका बंद ठेवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Ratnagiri
Ratnagiri Nagarparishad | रत्नागिरी नगरपरिषदेला वसुली मक्त्यातून मिळणार २० लाख ८२ हजारांचे उत्पन्न

शुक्रवारी सकाळी वेरळ घाटातील अवघड वळणावर मोठी दरड कोसळल्यानंतर काही अंतरावरील अंजणारी येथेही डोंगरकडा महामार्गावर आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. सुदैवाने दोन्ही घटनावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून वाकेड, वेरळ, अंजणारी आणि मठ घाट परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर कापण्यात आले आहेत.

पावसाळ्यात या उघड्या कड्यांवरून माती व दगड वारंवार महामार्गावर कोसळत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जेसीबी आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने माती व दगड हटविण्याचे काम सुरू असले तरी त्याचा वेग अत्यंत संथ असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अंजणारी येथे दोन दिवसांपूर्वी कोसळलेला डोंगरकडाही अद्याप पूर्णपणे हटवण्यात आलेला नसल्याने मुंबईच्या दिशेची मार्गिका बंदच आहे. परिणामी गोव्याच्या दिशेच्या मार्गावरूनच दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

Ratnagiri
Ratnagiri Fraud | परदेशवारी, ऑनलाइन ड्रेसच्या आमिषाने महिलांची २३ लाखांची फसवणूक

वेरळ, अंजणारी, वाकेड आणि मठ घाट परिसरात आणखी दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गेली १७ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे प्रत्येक पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या संकटांबाबत प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा माहामार्गाला लागलेले शुक्ल काष्ट अद्याप निवारलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news