

दापोली : पर्यटनासाठी आलेल्या अवघ्या 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. दापोली येथे ही दुर्दैवी घटना घडली. आंचल मदन सकपाळ (वय 13) असे या मुलीचे नाव असून ठाणे-कल्याण येथून हे कुटुंब दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यावर ही दुर्दैवी वेळ ओढवली आहे.
गेले तीन-चार दिवस दापोली परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. 25 डिसेंबर रोजी सकपाळ कुटुंब दापोलीत आले व दि. 27 डिसेंबर रोजी ते पर्यटन करून परतीला निघणार होते. आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये हे कुटुंब उतरले होते. सकाळी लवकर निघायचे असल्याने ते आपली मुलगी आंचल हिला उठविण्यासाठी गेले. मात्र, आंचल उठलीच नाही. तिचे शरीर थंडगार पडले होते आणि दातखिळी बसली होती. त्यांच्या लक्षात येताच हे कुटुंबीय हबकले व तत्काळ आंजर्ले येथील रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून आंचल हिला मृत घोषित केले. ही घटना कळताच दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, न.पं.चे अभियंता सुनील सावगे, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण व सामाजिक कार्यकर्ते दापोली रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पर्यटक व नातेवाईकांना धीर दिला. पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, सहायक पोलिस निरीक्षक यादव यांनीदेखील भेट दिली. आंचल हिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
आठवीतील आंचल...
आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी असून सेंट थॉमस विद्यालयाची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी रात्री ती जेवण करून झोपी गेली होती. मात्र, सकाळी ती उठलीच नाही. तिच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.