

चिपळूण शहर : महायुतीचा निर्णय स्पष्ट होत नसल्याने अखेर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासहीत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अजित पवार राष्ट्रवादी गट, भाजप आणि शिंदे शिवसेना अशा युतीमधील नगराध्यक्ष पदावरून तेढ निर्माण झाली आहे. त्यामुळे युतीचा अपेक्षित निर्णय राजकीय डावपेचांमुळे होत नसल्याचे निदर्शनास येताच राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी मुलाखती आटोपून घेतल्या.
10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी सुरू झाला आहे. हा कालावधी 17 नोव्हेंबर पर्यंत आहे. मात्र, चिपळुणातील युती आणि आघाडी विषयात परस्पर विरोधी पक्षांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. त्यातल्या त्यात जास्त भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) निर्माण झाली आहे. उबाठा सेना, शरद पवार राष्ट्रवादी यांच्यात सामंजस्य झाल्याची माहिती आघाडी वर्तुळातून मिळत आहे. मात्र, आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रेसकडून अद्यापही आघाडीमध्ये सामील व्हायचे की स्वबळावर लढायचे या बाबत त्यांच्याच पक्षात परस्परविरोधी मते असल्यामुळे त्यांची देखील ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका आहे. तर आघाडीतील उर्वरित शरद पवार राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने देखील विरोधी महायुतीच्या निर्णयावर आपली स्पष्ट भूमिका जाहीर करणे थांबवले आहे.
आघाडी व युती या दोन्ही गटात नगराध्यक्षपद हा कळीचा मुद्दा आहे. हा तिढा अद्यापही सुटलेला नाही. प्रामुख्याने महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदावरून तिढा वाढत चालला आहे तर आघाडीतील काहीअंशी हा तणाव कमी करण्याचे काम बैठकांच्या माध्यमातून समजूतदारपणे व त्या-त्या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मतांवर होत आहे.
महायुतीमधील तिनही मित्रपक्षांनी या पदावर दावा केला आहे. मात्र, त्यातील दोन पक्षांनी एका पक्षाच्या उमेदवाराला थेट विरोधच दर्शविला असून हा उमेदवार असल्यास आम्ही सहकार्य करणार नाही. त्या ऐवजी आमच्या दोन पक्षांमधील एक उमेदवार चालेल अशी भूमिका घेतल्याने महायुतीमधील तणाव अधिकच वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत आघाडी व युतीमधील अजित पवार राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांच्या कोअर कमिटीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, अजित पवार राष्ट्रवादीकडून युतीच्या निर्णयासाठी मुलाखती थांबविल्या होत्या. मात्र, आता त्यांनीदेखील शेवटच्या टप्प्यात हे नियोजन पूर्ण केले आहे.
दरम्यान, सर्वच पक्षातील अंतर्गत राजकीय घडामोडींचा वेध घेतले असता, काही माजी नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरण्याबाबत त्या-त्या पक्षांकडून सांगण्यात आले. मात्र, हे माजी नगरसेवक दोन्ही गटात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामध्ये निवडणुकीपासून दूर राहणे पसंत करू लागले आहेत. एका गटातील मित्रपक्षातील निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांकडून थेट नेत्यांची गुपचूप भेट घेऊन स्वबळावर लढण्यास मैत्रीपूर्ण लढत होऊ दे. आम्हाला सहकार्य करा. निवडणुकीनंतर आपण पुन्हा एकत्रच येणार अशी भूमिका घेऊन त्या पक्षातील नेत्यांची गुपचुप भेट घेऊ लागले आहेत तर काहीजण मुलाखत एका पक्षात आणि उमेदवार मागण्यासाठी विरोधी गटातील बड्या नेत्याचे दार गुपचुपपणे ठोठावू लागल्याचे सांगितले जाते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाची बळकटी वाढविण्यसाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या पक्षात घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आल्याचे लक्षात येताच त्या पक्षातील नेत्यांकडून आता सावध भूमिका घेतली जात आहे.