

जयसिंगपूर : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कुरुंदवाडचे भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांना फोडून राजर्षी शाहू विकास आघाडीत घेतले. त्यामुळे शिरोळ तालुक्यात महायुतीमध्ये फूट पडली आहे. तसेच तालुक्यात महाविकास आघाडीबरोबर भाजपचे पदाधिकारी ताराराणीच्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीत जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबत जोर बैठका सुरू असून, तिन्ही नगराध्यक्ष ठरवण्याबाबतही चर्चा सुरू आहे.
चार दिवसांपूर्वी कुरुंदवाड मधील घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गट्टी केली. सोमवारी जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. सतेज पाटील यांनी जयसिंगपूर येथे पत्रकार बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दत्तचे संचालक अनिलराव यादव, उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, पृथ्वीराज यादव, चंगेजखान पठाण यांच्यासह समविचारी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आ. यड्रावकर यांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर महाविकास आघाडीतील नेते, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी जयसिंगपूर येथे चर्चा केली. शिवाय जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ पालिकेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आ. यड्रावकर यांच्या विरोधात गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, आ. सतेज पाटील, आ. अशोकराव माने, राजू शेट्टी यांच्यासह नेते एकत्रित येऊन लढणार आहेत. या घडामोडींमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
यड्रावकरांनी गणपतराव पाटलांचा ‘विश्वास’ घेतला
शिरोळ दत्त कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विश्वास काळे हे काँग््रेासचे नेते गणपतराव पाटील यांच्या संबंधित आहेत. मंगळवारी रात्री आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात धक्कादायक म्हणजे विश्वास काळे यांच्या पत्नी श्वेता काळे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.