Kolhapur News| महायुती : घटक पक्षांची स्वबळाची तयारी
कोल्हापूर ः महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्र लढण्याच्या द़ृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीने आघाडी घेत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत, तर शिवसेनेने सर्वत्र लढण्याची तयारी केली आहे. भाजप सर्व मतदारसंघांत लढण्यासाठी चाचपणी करीत आहे. या सर्वातून महायुतीतील घटक पक्ष गरज पडल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर तयारीला वेग आला आहे. नेत्यांचे तालुक्या तालुक्यांत दौरे सुरू झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील सौम्य आरोपांच्या फैरी झडत आहेत. यामध्ये प्रतिस्पर्ध्यांवर आरोप करण्यापेक्षाही महायुतीत आलेल्या नेत्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कसे दुर्लक्षित केले त्याचा पाढा वाचला जात आहे. यातून महायुतीत आलेला नवा गट अधिक जोमाने प्रचार कार्यात लागेल, यासाठी नांगरट सुरू आहे. त्याचबरोबर महायुतीत आपलाच पक्ष मोठा कसे असेल किंवा सत्तेचा सर्वाधिक वाटा आपल्याच पक्षाला कसा मिळेल, यासाठी नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. यामध्ये अन्य पक्षांतील ताकदवान कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात मानाचे पान द्यायची तयारी सुरू आहे. जे आलेत आहेत, त्यांची काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर अन्य काही ताकदवान कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे.
इच्छुकांची त्या त्या पक्षात असलेली संख्या, नेत्यांकडे असलेला त्या कार्यकर्त्याचा वट, उमेदवारी मिळण्याची साशंकता या सर्व मुद्द्यांवर संबंधित इच्छुकाला महायुतीतीलच घटक पक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महायुती अंतर्गत इच्छुकांना आपल्याकडेच खेचण्यासाठी घटक पक्षात स्पर्धा तयार झाली आहे. या तयारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती या सर्वच निवडणुकांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांचा प्रतिसादही चांगला आहे. स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी करीत आहे. या पक्षाकडे जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत.
शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारण्यासाठी तयारी केली आहे. नेत्यांच्या आदेशानुसार उद्या गरज पडली, तर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवूनच त्यांनी व्यूहरचना आखली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे आहे. त्याशिवाय एक खासदार आणि तीन आमदार (एक सहयोगी) अशी त्यांची राजकीय ताकद आहे. भाजपमध्ये कायम दक्ष अशीच परिस्थिती असते. सर्व मतदारसंघांत आपला उमेदवार द्यायची वेळ आली, तर त्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यासाठी पक्षाकडे इच्छुकांची प्राथमिक यादी तयार आहे. राज्यसभेचे एक खासदार आणि एका सहयोगीसह तीन आमदार अशी या पक्षाची राजकीय ताकद आहे.

