

चिपळूण : पाच महिन्यांपासून नागरिकांच्या अडचणींचे कारण ठरलेल्या पिंपळी येथील पुलाच्या पुनर्बांधणीला अखेर गती मिळाली आहे. ऐन पावसाळ्यात गणेशोत्सवाच्या काळात अचानक कोसळलेल्या या पुलामुळे दसपटी विभाग तसेच गाणे-खडपोली एमआयडीसीचा चिपळूणशी असलेला संपर्क तुटला होता. या पुलाच्या तातडीच्या पुनर्बांधणीसाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल घेत ना. सामंत यांनी पुलाच्या कामासाठी तातडीने निधी मंजूर केला.
बुधवार 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पिंपळी येथील नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा पूल पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होऊन नागरिकांचा दैनंदिन प्रवास पूर्ववत होईल, असा विश्वास माजी आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही केले आहे.