

मंडणगड : विविध कारणांनी दहा वर्षे रखडलेल्या तालुक्यातील आंबडवे-लोणंद या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे काम यंदाच्या बांधकाम हंगामात अंतिम टप्प्यात आले आहे. मेअखेर शहर व परिसरासह रस्त्याचे काम पूर्ण होऊन महामार्ग शंभर टक्के कार्यक्षमतेने पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
सह्याद्री पर्वतांच्या उप पर्वत रांगातून जाणारा हा रस्ता नितांत सुंदर आहे. त्यामुळे तालुक्याचे वैभवात मोठी भर पडेल हे नक्की. व त्यामुळे रस्ते मार्गाने मुंबई पुणे ही शहरे वेळेने आणखी जवळ आली आहेत. मुंबई पुणे या महानगरांना रस्ते मार्गाने नजीकच्या अंतराने व केवळ चार तासांच्या वेळेत जोडणाऱ्या या रस्त्यामुळे तालुक्याचे विकासाचा मार्ग भविष्यात खऱ्याअर्थाने प्रशस्त होण्याचे सद्यस्थितीत निर्माण झालेले आशादाई चित्र यानिमित्ताने अधिक सुस्पष्ट होत आहे. 2014 साली संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून चाळीस किलोमीटर इतक्या लांबीच्या काँक्रीटच्या रस्त्याचे नियोजन केंद्रशासनाकडून केले गेले व कागदावरील हा रस्ता 2025 साली पूर्णत्वास जात असताना गेल्या दशकात तालुक्यात रस्ते, पाणी व वीज या पायाभूत सुविधांचे निर्मितीत शासनाने मोठी गंतवणूक केलेली असल्याने पूर्णत्वास गेलेला राष्ट्रीय महामार्ग तालुक्याचे विकासाची कूस बदलण्याचे मुख्य कारण ठरणार आहे.
महानगरांपासून चार तासांचे अंतर या बलस्थानाचा लाभ घेण्यासाठी प्रशस्त रस्त्यांची मोठी अडचण यानिमित्ताने दूर होणार आहे. येथे उपलब्ध जमीन, पाणी, व मनुष्यबळाचा व पर्यावरण यांचा लाभ घेऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी याकरिता तसेच औद्योगिक प्रकल्प तालुक्यात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे ही जमेची बाजू लक्षात घेता गेल्या दोन दशकात येथील पर्यावरण व जैवविविधता लक्षात घेऊन तालुक्यात रियल इस्टेट क्षेत्रात झालेल्या गंतवणुकीचे दृश्य परिणामही आगामी काळात दिसणार आहेत.
सध्या प्रयोग म्हणून असे अनेक उपक्रम यशस्वी होताना दिसून येत आहेत. येथील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन महानगरातील गंतवणूकदारांनी येथे गावागावात जागेत मोठी गंतवणूक केली आहे. सेकंड होमकरिता पसंती मिळून येथे मोठी गुंतवणूक झाली आहे. एकंदरीत उद्योगांकरिता आवश्यक पायाभूत सविधांसाठी पूर्वी झालेल्या गंतवणुकीस पूर्णत्वाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे मोठे लाभ होणार आहेत. याचबरोबर नव्या गंतवणुकीस मोठा वाव निर्माण होणार आहे.