

देवरुख : नजीकच्या वाशीतर्फे देवरुख गावात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शनिवारी वन विभागाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र, पिंजऱ्यात पकडल्यानंतर काही तासांतच या बिबट्याचा मृत्यू झाला. त्वचारोग व न्यूमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
वाशी तर्फे देवरुख येथील बौद्धवाडी परिसरातील एका पडक्या घरात बिबट्याने मुक्काम ठोकल्याची घटना उघडकीस आली होती. हा बिबट्या गेली 10 दिवसांपासून ग्रामस्थांना वारंवार दिसत होता. काही दिवसांपूर्वी भरदिवसा या बिबट्याने माकडाची शिकार करून पडक्या घरात प्रवेश केल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. त्यानुसार वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून सतर्कता वाढवली होती. बिबट्याच्या हालचाली या कॅमेऱ्यांत कैद झाल्या होत्या. शनिवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास गावातील करंडेवाडी परिसरात रस्त्यालगतच्या मोरीत बिबट्या आढळून आला. याबाबतची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. वनपाल सागर गोसावी व वनरक्षक पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत पिंजरा लावला. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. या मोहिमेदरम्यान ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.