

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आणि काही वर्षांतच जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला संजीवनी मिळाली आहे. पूर्वी ज्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे, कोल्हापूरला जावे लागत होते. मात्र, आता त्या शस्त्रक्रिया रत्नागिरीतच मोफत होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डिसेंबर 2025 मध्ये 21,330 ओपीडी, आयपीडी 2 हजार 375, गंभीर सर्जरी 232, मायनर सर्जरी 1,190 झालेल्या आहेत. एकंदरीत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून गोरगरीब, सामान्य रुग्णांना आधार बनले आहे.
पूर्वी जिल्हा सिव्हिल रुग्णालयात फारसी गर्दी नसायची, मोठी शस्त्रक्रिया, ऑपरेशन यासाठी रत्नागिरीतील रुग्ण कोल्हापूर, मुंबई गाठायचे. गरीब रुग्णांचा ही मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. गोरगरिबांना मोफत पण चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी महाविद्यालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रूग्णालयात रूग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या. दररोजी 1 हजार हून अधिक बाह्यरूग्णाची संख्या झाली. जिल्हा रूग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अपघात आणि मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया इथेच होत आहेत. त्यामुळे रूग्णांना मुंबई, पुण्याला पाठवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ऑर्थोपेडिकतज्ज्ञ उपलब्ध झाल्याने गुडघे, खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रियादेखील वाढल्या आहेत. हाडांच्या शस्त्रक्रियामध्ये लाखोंचा खर्च होतो मात्र शासकीय रूग्णालयात डॉ. देवकर आणि त्यांच्या टीमने मोफत केल्या जात आहे.एकूण 618 मेजर शस्त्रक्रिया पार पडल्या.
एकंदरित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह््याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ मिळाले असून हजारो गोरगरिब रूग्णांना याचा थेट फायदा होत असून रूग्णांना आता सिव्हीलबद्दल विश्वास वाढला आहे. खासगीऐवजी रूग्ण आता सिव्हील हॉस्पीटलमध्ये वळू लागले आहेत.
नैसर्गिक प्रसूती वाढल्या
गायनॅकोलॉजिस्ट डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड वर्षात 2 हजार 725 नैसर्गिक प्रसूती तर 1 हजार 975 सीझर प्रसूती झाल्या आहेत. ईएनटी डॉ. बागे यांच्यामुळे आता दुर्बिणीद्वारे विनाटाक्याच्या शस्त्रक्रिया होत आहेत. नाकात, घशात अडकलेल्या वस्तू काढणे, कानाचा पडदा सांधणे, अन्ननलिकेच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. नेत्रविभागात 1080 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहे.