

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकणचा हापूस आंबा देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील आंबा व्यावसायिकांकडून नव्या बाजारपेठांचा शोध सुरू झाला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील व्यावसायिकांनी नुकतीच नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
आंब्याची मागणी, बाजारपेठेतील व्यवहार, निर्यातीच्या संधी आणि उत्पादकांना मिळणारा दर याबाबत झालेल्या चर्चेमुळे आगामी हंगामात आंबा निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील आंबा उत्पादकांसाठी वाशी बाजारपेठ महत्त्वाची आहे.
हंगामात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा या बाजारपेठेत दाखल होतो. येथून देशातील विविध शहरांमध्ये तसेच निर्यातदारांच्या माध्यमातून परदेशातील बाजारपेठेत आंबा पाठविला जातो. त्यामुळे या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधणे आणि बाजारपेठेतील बदल समजून घेणे व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
बाजारपेठेचा अभ्यास
वाशी येथे झालेल्या चर्चेत आंब्याची आवक, मागणी, दर्जानुसार दर, पॅकिंग, वाहतूक आणि बाजारपेठेतील ग्राहकांची पसंती यांसारख्या बाबींवर चर्चा करण्यात आली. आंब्याच्या दर्जानुसार योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मालाची हाताळणी व वाहतूक अधिक परिणामकारक करणे आणि मागणी असलेल्या बाजारपेठेत थेट माल पोहोचविणे यावर भर देण्याची गरज यावेळी अधोरेखित झाली. हापूसला देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशातही मागणी आहे.
आंबा निर्यात वाढली तर त्याचा थेट फायदा उत्पादकांना मिळणेही आवश्यक आहे. निर्यातक्षम दर्जाचा आंबा तयारीपासून त्याची प्रतवारी, पॅकिंग, बाजारपेठेत पोहोचविण्यापर्यंतची साखळी सक्षम करण्याची गरज आहे. उत्पादकांना बाजारभावाची अचूक माहिती मिळाल्यास योग्य वेळी योग्य बाजारपेठ निवडणे शक्य होणार आहे.