

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती अंतिम टप्प्यावर आली आहे. ४७८ उमेदवारांपैकी ४५७ उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. उर्वरित २१ उमेदवार गैरहजर राहिले आहेत. पुढील आठवड्यात या हजर असलेल्या सर्व उमेदवारांचे समुपदेशन होणार आहे.
दरम्यान, यापैकी २०१८-१९ टीईटी घोटाळ्यातील १३ उमेदवारांनी अर्ज केले असल्याचे आढळून आले आहे. त्यांची नावे शिक्षण विभागाकडून सायबर क्राईम, पुणे यांना पाठवण्यात आली आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पडताळणी करूनच नियुक्ती द्यायची का नाही, हे ठरणार असल्याचे जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेत तब्बल १ हजारहून अधिक पदे रिक्त असून पवित्र पोर्टलद्वारे ४७८ शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. सलग तीन दिवस उपस्थित शिक्षकांची कागदपत्रांची पडताळणी झाली. त्यापैकी २१ उमेदवार गैरहजर राहिले होते. त्यांना पुन्हा सोमवारी संधी देण्यात आली होती.
सन २०१८-१९ मधील टीईटी घोटाळ्यातील १३ उमेदवारांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीत अर्ज केलेले आढळून आले आहे. त्यामुळे १३ जणांची यादी सायबर क्राईम, पुणे यांना पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडून कसून तपासणी, पडताळणी केल्यानंतर सायबरच्या अहवालानुसार त्या उमेदवारांना नियुक्ती द्यायची की नाही याचा निर्णय होणार आहे.
२१ उमेदवारांनी दांडी मारलेली आहे. गैरहजर असलेल्या उमेदवारांमध्ये टीईटी घोटाळ्यातील १३ उमेदवारांचा समावेश आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सायबर क्राईमचा अहवाला आल्यानंतरच याबाबत निश्चित माहिती येणार आहे. तसेच नियुक्ती प्रक्रियेबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.