

राजापूर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यावर जागा उपलब्ध असलेल्या काही हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर पदार्थ शिजविण्यास सुरुवात केली आहे, तर काहीनी इलेक्ट्रिक शेगडा वापर सुरू केला आहे. यामध्ये मर्यादा येत असल्याने खवय्यांना पाहिजे ते पदार्थ बनवून मिळत नसल्याने नाराजीचे सुर उमटत आहेत.
काही भागात तर स्पेशल चहा देणे बंद झाले आहे तर खुसखुशीत भजीसह अन्य पदार्थांना सक्तीने रजेवर पाठवल्याचे चित्र आहे. तालुक्यातील गॅसला पर्याय म्हणून हॉटेलमध्येच काही व्यावसायिकांनी दगडांच्या तसेच रिकाम्या तेल डब्यांच्या चुली, तर जांभा उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडी, तर काहीनी लोखंडी शेगड्या पर्याय म्हणून अवलंबला आहे.
तालुक्यातील पश्चिम भागात समुद्र किनारी परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी गॅस सिलिंडरअभावी स्पेशल गावठी कोकणी भाज्या बंद केल्या आहेत, तर काहीनी स्पेशल चहासुद्धा देणे बंद केले आहे. काही हॉटेलचालकांना चुली पेटवण्यासाठी जागाच नाही. अशा हॉटेलचालकांनी सुरुवातीला मिळालेल्या सिलिंडरवर पुढे काही दिवस काढता येतील असे नियोजन केले आहे.
तरीही काही हॉटेल व्यवसाय पुढील काही दिवसांत बंद करावे लागतात की काय असे चित्र आहे. एकीकडे गॅस मिळत नसल्याने नाराजी तर काही ठिकाणी चुलीवर शिजवून पदार्थ मिळत असल्याने खुशीही दिसून येत आहे. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन तालुक्यातील बहुतांशी हॉटेलमध्ये चुली पेटल्या आहेत. चुलीवरच्या जेवणामुळे हॉटेलमध्ये मिळणाऱ्या विविध खाद्यपदार्थांना मर्यादा आली आहे.
समोसे, इडली, वडा, स्पेशल चहा, जेवणमधील स्पेशल डिसेस आदी पदार्थावर मर्यादा आली आहे. यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकाला सेवा देताना तारेवरील कसरत होत आहे. केवळ शाकाहारी, मांसाहारी थाळी प्रकार ठेवला आहे. स्पेशल चहा, कॉफी, काळा चहा हे प्रकार बंद केले असून एकदाच थर्मासमध्ये चहा तयार करून ठेवून ती चहा दिली जात आहे. सकाळी ठराविक पदार्थ तयार करून ते येणाऱ्या ग्राहकांना दिले जात आहेत.