

Prakash Ambedkar on Maharashtra Yuti Aghadi
खेड: राज्यात आगामी चार महिन्यांत महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून, कोकण दौऱ्यावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युती आणि आघाड्यांच्या राजकारणावर ठाम भूमिका मांडली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि.१३) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोरवंडे गावात एका विहाराचे उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आणि सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
आगामी निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी राज्यभर निवडणुकांत उतरणार असून, युती अथवा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार जिल्हाध्यक्षांनी घ्यावा, असे ठरवण्यात आले आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदे गट यांच्या संभाव्य युतींविषयी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेना काँग्रेससोबत जाईल का? काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहील का? शिंदे गटाचा भाजपसोबतचा गठबंधन टिकेल का? असे अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी राज्यातील युती-आघाड्यांमधील अस्थिरतेकडे इशारा दिला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक राजकारणात वंचित आघाडीच्या वाढत्या सक्रियतेमुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय गणिते कशी बदलतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.