

सांगली : उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात एक हजारावर लोक चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडले असून, शासनाने फक्त 38 लोकांचा मृत्यू झाला, म्हणून जाहीर केले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या लोकांचे अंत्यविधी कसे केले, याचा जाब शासनाला विचारावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाऊन आल्यापासून चुकीच्या करारामुळे शेअर मार्केट पूर्णपणे कोसळत आहे, असा आरोपही त्यांनी केला. येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, महाकुंभमेळा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. यापूर्वी झालेल्या महाकुंभमेळ्याची सोय इतर पक्षांचे सरकार असतानाही झाली होती. या महाकुंभमेळ्याची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली. या महाकुंभमेळ्याचे सध्याच्या सरकारकडून केवळ मार्केटिंग सुरू आहे. केंद्र, राज्य सरकारकडून सुरू असलेल्या घटना पाहता, धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यंत नेऊन पोहोचवले आहे. ज्याची विरोधी पक्षाने चर्चा केली पाहिजे, ते न करता अदानीसारख्या प्रश्नाची विरोधी पक्ष चर्चा करीत आहे. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या स्थितीत गेलाय. त्यातून त्यांनी स्वत:ला सावरत, हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, भारतातून जाणार्या मालाला अमेरिकेत कमी कर लावण्यात येत होता. त्यामुळे निर्यात वाढली होती. मोदी यांनी करार केल्यामुळे अमेरिकेतून भारतात येणार्या आणि भारतातून जाणार्या मालाला एकसमान कर लागला आहे. यामुळे भारतातील निर्यात घटली आहे. दुसरीकडे अमेरिकन डॉलर महाग होत चालला आहे. यामुळे आगामी काळात रशिया वगळता अमेरिकेसह इतर देशातून येणारे डिझेल, पेट्रोल महाग होणार आहे. यामुळे पुन्हा महागाई वाढणार आहे. अर्थव्यवस्थेवरचे हे मोठे संकट आहे. विरोधी पक्षांनीही घसरत चाललेल्या आर्थिक स्थितीवर मौन पाळले आहे. अमेरिका आणि अदानीचे काय होईल ते होईल, पण याचा बागुलबुवा म्हणून वापर केला जातोय.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही राजांनी इतिहास निर्माण केला, तो प्रेरणादायी आहे. मराठा समाजाने त्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेत आपला नवा इतिहास निर्माण केला पाहिजे, असे आवाहन यावेळी अॅड. आंबेडकर यांनी केले.
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रध्दांजली वाहिली, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रध्दांजली वाहिली होती. मोदींचा ‘मेसेज’ राहुल गांधी यांनी कॉपी पेस्ट केला आहे. याबाबत चर्चा नाही. संपूर्ण भारतामध्ये शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे धडे आहेत, त्यांचा त्यांनी नीट अभ्यास करावा, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.