

पुणे: काही वर्ग व काही समूह असे आहेत की, त्यांना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलेली क्रांती ही आजही सलत आहे. अजूनही त्यांच्यामध्ये जळजळतेय, विरोध चाललेला आहे. फुले चित्रपटाला विरोध करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही. जर सेन्सॉर बोर्ड हा विरोध कायम ठेवणार असेल, तर सेन्सॉर बोर्डाचे जे मेंबर आहेत, त्या मेंबरच्या घरासमोर तसेच त्यांच्या कार्यालयावर आम्ही हल्लाबोल करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे शुक्रवारी (दि.11) अभिवादन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. या वेळी त्यांनी फुले चित्रपटाचे प्रदर्शन रोखल्याने संताप व्यक्त करत सेन्सॉर बोर्डाविरोधात आंदोलन केले. तसेच, सरकारला इशारादेखील दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी केलेले कार्य दिशादर्शक आहे. 150 वर्षांपूर्वी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला मार्गदर्शक आहे. असे असताना त्यांचे कार्य हे काही समाजाला आजही पटत नाही. फुले यांच्या कार्याबद्दल त्यांची जळजळ होते. त्यातूनच त्यांच्या चित्रपटाला देखील विरोध होत आहे.
सेन्सॉर बोर्डामध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. चित्रपटातील दृश्यांमुळे समाजावर परिणाम होईल का, याची तपासणी बोर्डाकडून केली जाते. मात्र, संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील दिले आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. चित्रपटातील सीन हे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या फुले यांच्या समग्र वाङ्मयावर आधारित आहेत.
आता केंद्र सरकार देखील हिंदीत त्यांचे भाषांतर करणार आहे. त्यामुळे शासनमान्य असलेल्या चित्रपटातील दृश्यांना जर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही, तर आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. सरकार एकीकडे फुले यांना अभिवादन करते, तर दुसरीकडे त्यांच्या कार्यावर आधारित सिनेमाला विरोध करते, हा विरोधाभास थांबला पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांना टोला लगावला. आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्री एकीकडे महात्मा फुलेंना अभिवादन करतात. त्यांचे मोठे फलक फुलेवाडा येथे लावण्यात आले आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध केला जात आहे. त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. जर ‘फुले’ सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित झाला नाही, तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात घुसू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
भुजबळ सत्तेत, त्यांनी अजित पवारांशी बोलून स्मारक पूर्ण करावे
भुजबळांच्या आंदोलनाच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. आंबेडकर म्हणाले, भुजबळ हे शासनामध्ये आहेत. शासनामध्ये असल्यानंतर उपोषण करण्यापेक्षा शासकीय निधी कसा वापरला जाईल व त्याचे नियोजन कसे करता येईल, याकडे बघावे. त्याचबरोबर स्मारकाचा आराखडा वेळेत पूर्ण करावा. सध्या अजित पवार हेच सरकार चालवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भुजबळ यांनी अजित पवारांसोबत बसून टाइमटेबल ठरवून लवकरात लवकर स्मारक पूर्ण करावे.