

चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी महोत्सवातून शिकण्यासारखे आहे. कोकण हा भाग बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित होता. मागासलेला प्रदेश, नोकरीसाठी मुंबई, पुणे सारख्या शहरात धाव घेणारा इथला तरुण असे या कोकणाकडे पाहिले जायचे. मात्र, आता वाशिष्ठीचा कृषी महोत्सव पाहिल्यानंतर आता कोकण मागासलेला राहिला नाही. कोकण प्रगतीकडे झेप घेतोय असे चित्र अनुभवायला मिळत आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी चिपळुणातील वाशिष्ठी दूध प्रकल्प आणि कृषी महोत्सवाचे भरभरून कौतुक केले. कोकणसाठी प्रशांत यादव यांनी सुरू केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यांना सर्वांनी साथ द्या, असे आवाहन केले.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सौ. नीलम राणे, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, महाराष्ट्र राज्य सह. दूध महासंघ मर्या. (महानंद)चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अनिरूद्ध निकम, खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, देवरूखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, गुहागरच्या नगराध्यक्षा निता मालप, चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, चिपळूण नागरीच्या संचालिका ॲड. नयना पवार, तसेच शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी स्वागत केले.
खा. नारायण राणे पुढे म्हणाले, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचा 51वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कोकण विकसित व समृद्ध व्हावा, इथे शेती, दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य पदार्थातून शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता यादव झटत असल्याचे कौतुक केले. आपण सुक्ष्म, लघु उद्योग कारभार सांभाळत असताना अन्य राज्ये शेती, उद्योग क्षेत्रात पुढे असल्याचे दिसून आले. मात्र, कोकण मागे आहे. कोकणाला समुद्रकिनारा लाभलेला आहे. मासेमारी होते, आंबा, काजू, फणस, नारळ, करवंदे, आवळे, जांभळे ही पिके घेतली जातात. एवढी बागायती आणि एवढं सगळं असताना इथला तरूण अन्य शहरांमध्ये धाव का घेतो आहे? याचा विचार करायला लावणारे हे प्रदर्शन आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरात वनौषधी वनस्पती आहे. याकडे आपण कधी ढुंकुनही पाहत नाही. आपण खासदार झाल्यानंतर केंद्रशासनाला पत्र लिहून याचा सर्व्हे करायला आपण सांगितले आहे. अहवाल येईल तेव्हा येईल. मात्र, या कृषी महोत्सवात कृषी अवजारे, वनौषधी वनस्पती, पिके, फळ बागायती यांची लागवड कशी करावी याची माहिती दिली गेली आहे.
कोकणात तुम्हाला यायला वेळ लागला, असा उल्लेख करून हा उपक्रम सुरू करायला वेळ लागला असेल. 10-15 वर्षे अगोदर आला असतात तर कोकणातील अर्थव्यवस्था वेगळी असती, अशा शब्दात श्री. यादव यांचे कौतुक केले. कोकणी माणसाला एक सवय आहे, चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही, चांगल्याचे कौतुक करायचे नाही. आतातरी चांगल्याचे अनुकरण करा. आपणदेखील चार झाडे लावली पाहिजेत. गोपालनसारखे व्यवसाय सुरू करून उत्पन्न वाढवले पाहिजे. युरोपातील काही देश दुधावर श्रीमंत आहेत. डेन्मार्क या देशाची अर्थव्यवस्था दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. कोकणात 5 हजार मि.मी. पाऊस पडतो. शेतीसाठी पाणी उपयोगात आणू. गायी-म्हशी पाळू, दुग्धजन्य पदार्थ बनवू, यातून मुलाबाळांना शिकवण्यासाठी श्रीमंत होऊ, मुलांना डॉक्टर-इंजिनियर करू. एवढंच काय आयएएस, आयपीएस उद्योजक बनवू, असा संकल्प तुम्ही बाळगला पाहिजे. कृषी महोत्सवात मुलांना नुसतं फिरवू नका, या महोत्सवातून चांगलं काही करता येईल हे मुलांना समजावून सांगा. आपलं उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत नाही. तुमचे कुटुंब सबळ, सुखी, समृद्धीसाठी प्रशांत यादव मेहनत घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो तेव्हा 35 हजार रूपये दरडोई उत्पन्न होते. आता ते 2 लाख 60 हजार रूपये इतके झाले आहे. आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार असून रत्नागिरी जिल्ह्याचेही दरडोई उत्पन्न वाढविण्याची आपलीही जबाबदारी आहे. कृषी प्रदर्शन महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला मेळावे घेण्यास सांगितले आहे. यामध्ये शेतकरी, युवक, महिला, उद्योग या मेळाव्यांचा समावेश असून यातून या सर्वांना व्यवसायासाठी मार्गदर्शन होणार आहे, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांद यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वप्ना यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.