

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणाऱ्या ०११३९/४० नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेसला रेल्वे बोर्डाने नियमित दर्जा देत ११२०३/०४ या क्रमांकाने कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी दिली आहे. विदर्भ, खानदेश आणि कोकण प्रांताला जोडणारी ही रेल्वे सेवा आता नियमित झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मात्र वैभववाडी रोड, विलवडे, पेण, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, मूर्तीजापूर आणि चांदूर या स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा नसल्याने प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती.
नवरात्र, दिवाळी आणि नाताळच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाडी म्हणून सुरू करण्यात आलेल्या या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे बोर्डाने तिला नियमित करण्याचा निर्णय घेतला.
सुधारित वेळापत्रकानुसार ११२०३ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३.०५ वाजता नागपूर जंक्शनवरून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४६ वाजता मडगाव येथे पोहोचेल, तर ११२०४ मडगाव-नागपूर एक्स्प्रेस गुरुवारी आणि रविवारी रात्री ८.०१ वाजता मडगावहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.४६ वाजता नागपूरला पोहोचेल.
ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीचे संगणकीय आरक्षण आयआरसीटीसी, एनटीईएस अॅप तसेच रेल्वे आरक्षण केंद्रांवर १७ मेपासून सुरू करण्यात आले आहे. या नियमित रेल्वे सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तेकर, समन्वय समितीचे अध्यक्ष यशवंत परब तसेच विविध प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.